फलटणला श्री स्वामी समर्थांचा १४४ वा पुण्यतिथी सोहळा संपन्न


दैनिक स्थैर्य । दि.०१ मे २०२२ । फलटण । येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने श्री स्वामी समर्थ अक्कलकोटकर महाराजांचा 144 वा पुण्यतिथी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रम, रथातून पादुकांची नगरप्रदक्षिणा व महाप्रसादाच्या कार्यक्रमाने संपन्न झाला.

पुण्यतिथीनिमित्त शहरातील गजानन चौक, अहिल्यानगर येथील प्रसिद्ध व जागृत अशा श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सुसज्ज रथाचे पुजन श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व महात्मा एज्युकेशन सोसायटीचे सचिव रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी श्री स्वामींचे निस्सीम भक्त व मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय चोरमले तसेच महाप्रसाद अन्नदाते अतुलशेठ कापडीया व सौ.सविता कापडीया (अकलुज) यांच्यासह भक्तसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

रथाच्या पुजनानंतर संजय चोरमले यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच अन्नदान कार्याबद्दल श्रीमंत संजीवराजे यांचे हस्ते श्री व सौ.कापडीया यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर असंख्य भाविकांच्या उपस्थितीत रथाने गजानन चौक, तेली गल्ली, दगडी पुल, शंकर मार्केट, श्रीराम मंदीर, गजानन चौक अशी वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रदक्षिणा पूर्ण केली. प्रदक्षिणेदरम्यान ठिकठिकाणी शहरवासियांनी रथाचे स्वागत करुन पादुकांचे दर्शन घेतले. सायंकाळी मंदीर परिसरात आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. दरम्यान, पुण्यतिथीच्यानिमित्ताने मंदिरात करण्यात आलेली फुलांची आकर्षक आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.


Back to top button
Don`t copy text!