मलवडीच्या १४ वर्षीय पैलवान मुलाचा हृदयविकाराने मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ जानेवारी २०२५ | सातारा |
माण तालुक्यातील मलवडी गावच्या १४ वर्षीय मुलाचा कुस्ती सरावानंतर हार्ट अटॅकनं मृत्यू झाला आहे. जय दीपक कुंभार असं दुर्दैवी मुलाचं नाव असून तो पुण्यातील जाणता राजा कुस्ती संकुलात कुस्तीचा सराव करत होता. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. तसेच कुस्ती क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे.

मलवडी (ता. माण) गावातील दीपक कुंभार यांनी जय या आपल्या एकुलत्या एका मुलाला नामवंत मल्ल बनविण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्या ध्येयानेच त्यांनी मुलाला सरावासाठी पुण्यातील जाणता राजा कुस्ती संकुलात दाखल केलं होतं. ७ ऑगस्ट २०१० रोजी जन्मलेल्या जय याने मलवडी, आंधळी येथे सराव करताना कुस्तीत चुणूक दाखवली होती. स्थानिक कुस्ती मैदानात तो नावलौकीक मिळवत होता. मात्र, लहान वयातच हार्ट अटॅकनं त्याचा मृत्यू झाल्यानं मुलाला नामांकित मल्ल बनविण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं.

शालेय कुस्ती स्पर्धेत सलग दोन वर्षे जयने १४ वर्षे वयोगटात राज्यपातळीवर तिसरा क्रमांक तर, यावर्षी १७ वर्षे वयोगटातील ६२ किलो वजनी गटात विभागीय पातळीवर तिसरा क्रमांक पटकावला होता. नुकत्याच खंडोबा यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानातही जयने नेत्रदीपक कुस्ती करत वाहवा मिळवली होती.

मुलगा जयला महाराष्ट्र केसरी झाल्याचं वडीलांना पाहायचं होतं. तसंच जयने देशासाठी कुस्तीचं ऑलिम्पिक पदक मिळवावं, हे ध्येय ठेउन वडील दीपक कुंभार यांनी मुलाला पुण्यातील कुस्ती संकुलात दाखल केलं होतं. मात्र, जयच्या आकस्मिक निधनानं त्यांचं स्वप्न अधुरं राहिल आहे.

अवघ्या १४ व्या वर्षी उदयोन्मुख मुलाचा मृत्यू झाल्यानं माण तालुक्यावर शोककळा पसरली. पुणे आणि माण तालुक्यातील मल्लांनी मलवडीकडे धाव घेतली. जयचे पार्थिव गावात आणल्यानंतर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. यावेळी उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले. त्याच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!