स्थैर्य, मुंबई, दि. 18 : ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत 87 विमानांतून तब्बल 14 हजार 203 प्रवासी मुंबईत दाखल झाले असून ते विविध देशातून मुंबईत आले आहेत. 1 जुलै 2020 पर्यंत आणखी 71 विमानांनी प्रवासी मुंबईत येणार आहेत.
आलेल्या एकूण 14 हजार 203 प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 5248 इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 4615 आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 4340 इतकी आहे. आलेल्या सर्व प्रवाशांना महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या दिनांक 24 मे 2020 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार क्वारंटाईन करण्यात येत आहे.
आलेले प्रवासी हे विविध देशांमधून आले आहेत त्यामध्ये ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगानिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्वीडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर आदी देशांचा समावेश आहे.
मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी गेल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाईन केले जात आहे.
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत त्यांना मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येते व त्या प्रवाशांचा प्रवासी वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.
‘वंदेभारत’ अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.