१४ ग्रामपंचायतींचा नीरा उजवा कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध; ग्रामसभेत ठराव संमत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ जुलै २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींनी नीरा उजवा कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध केला आहे. त्याबाबतचे ठराव या ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा घेऊन संमत केला आहे.

फलटण तालुक्यातील तडवळे बंगला ते रावडी या सुमारे चार किलोमीटर अंतराच्या नीरा उजवा कालव्याचे सिमेंट अस्तरीकरणाचे काम जलसंपदा विभागाकडून सुरू झाले आहे. ठेकेदाराने या ठिकाणी सद्य:स्थितीत नीरा उजवा कालव्याचे आवर्तन बंद असल्याने युद्धपातळीवर अस्तरीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र, याविरोधात फलटण तालुक्यातील सुमारे १४ ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा घेऊन हे अस्तरीकरण तातडीने बंद करण्याबाबतचे ठराव संमत केले आहेत.

तडवळे (ता. फलटण) येथे नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाविरोधात ग्रामस्थांच्या वतीने हनुमान मंदीर पटांगणावर विशेष ग्रामसभेचे आयोजन केलेे होते. त्यावेळी या ठिकाणी फलटण तालुक्यातील सुरवडी, तडवळे, साखरवाडी, खामगाव, कुसूर, मिरेवाडी, सासवड, रावडी खुर्द, रावडी बुद्रुक, घाडगे मळा, खराडेवाडी, भिलकटी, वडजल, निभोरे या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील शेतकरी व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी झालेल्या ठरावांमध्ये अस्तरीकरणाबाबत विविध विषयांवर चर्चा करून काही ठराव संमत करण्यात आले.
शासनाकडून होत असलेले अस्तरीकरणाचे काम हे या भागातील शेतकर्‍यांचे भविष्य उद्ध्वस्त करणारे असल्याचा आरोप करून या भागातील शेतकर्‍यांना भविष्यात आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नसल्याने कोणत्याही परिस्थितीत हे अस्तरीकरणाचे काम होऊ देणार नसल्याचा निर्धार यावेळी शेतकर्‍यांनी केला.

कालवा अस्तरीकरणाचे दुष्परिणाम सांगताना शेतकर्‍यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. यामध्ये कालवा अस्तरीकरण झाल्यास या ठिकाणी भविष्यात विहिरी, बोअरवेल व विंधन विहिरी यांचे पाझर बंद होऊन हे पाण्याचे स्त्रोत कायमस्वरूपी आटणार आहेत. परिणामी ‘कालवा उशाला व कोरड घशाला’ अशी अवस्था येथील शेतकर्‍यांची होणार आहे. अस्तरीकरणामुळे शेतीपाण्याच्या टंचाईबरोबर बहुतांशी गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा कालव्यालगतच्या विहिरींमधून केला जात असल्याने या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. परिणामी या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ ग्रामपंचायत प्रशासनावर येणार आहे.

फलटण तालुक्याची ‘कायम दुष्काळी तालुका’ अशी ओळख ही १०० वर्षांपूर्वी या भागातून हा कालवा वाहिल्याने पुसली असून खर्‍या अर्थाने हा भाग सुजलाम् सुफलाम् झाला आहे. मात्र, अस्तरीकरणामुळे पाझर बंद झाल्याने या भागातील हजारो हेक्टर पिके जळून जाण्याचा धोका भविष्यात निर्माण होणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत या कालव्याचे अस्तरीकरण होऊ देणार नसल्याचा सर्वानुमते निर्धार व्यक्त करण्यात आला. नीरा उजवा कालवा संघर्ष समितीची स्थापना करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, जलसंपदा विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांना निवेदन देऊन त्वरित काम थांबवण्याबाबत आदेश द्यावा, अशी विनंती करणार असल्याबाबतचे मत यावेळी शेतकर्‍यांनी मांडले.


Back to top button
Don`t copy text!