
दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । फलटण । महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा अंतर्गत कार्यरत असलेल्या अंतर्गत ओमसाई लोकसंचलित साधन केंद्र, फलटण या संस्थेची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील अनंत मंगल कार्यालयात संपन्न झाली. यावेळी फलटण पंचायत समितीचे पशुसंवर्धन विस्तार अधिकारी डॉ.नंदकुमर फाळके, पुणे विभागीय सनियंत्रक व मूल्यमापन अधिकारी विलास बच्चे, महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा जिल्हा समन्वयक विजय डोके, सहाय्यक जिल्हा समन्वयक अशोक चव्हाण, आयडीबीआय बँकेच्या साखरवाडी शाखेचे व्यवस्थापक निळकंठ देसाई, ओमसाई संस्थेच्या अध्यक्षा सौ.सीमा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान डॉ.नंदकुमार फाळके यांनी महिलांना पशूसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणार्या योजनांबद्दल माहिती दिली. सौ.राजश्री नाळे यांनी महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करुन बचत गटाच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विलास बच्चे यांनी महिलांना आरोग्य तपासणीसह संस्थेचे संचालक मंडळ व बचत गटाच्या कार्यपद्धतीविषयी मार्गदर्शन केले. विजय डोके यांनी महिलांना बँक कर्ज, उद्योग व्यवसाय याविषयी माहिती दिली. अशोक चव्हाण यांनी महिलांना बचत गटाच्या पंचसूत्री व दशसूत्री विषयी मार्गदर्शन केले. तर निळकंठ देसाई यांनी महिलांना कर्ज, व्याजदर या संबंधी बँक कामकाजाची माहिती दिली. एच.डी.एफ.सी. बँकेचे श्री.जाधव, बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक श्री.नाळे यांनीही महिलांना बँकींगविषयी मार्गदर्शन केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या सन 2021 – 22 या आर्थिक वर्षातील कामकाजाची माहिती देणार्या अहवालाचे प्रकाशन संपन्न झाले. कार्यक्रमाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच आदर्श बचत गटांना रोपे देवून शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमासाठी जीवन सहारा टीमचे सहकार्य लाभले. नेहरु युवा केंद्राच्यावतीने सौंदर्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमसाई लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सौ.शीला घाडगे यांनी केले. प्रास्ताविक सौ.शीतल सोनवणे यांनी केले. कार्यक्रमास साधन केंद्राच्या संचालिका, सदस्या, कर्मचारी आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.