रमाई आवास योजनेंतर्गत फलटण तालुक्यासाठी १३४ घरकुले मंजूर


दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रमाई आवास (घरकुल) योजना राबविण्यात येते. या योजनेची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून यामध्ये सातारा जिल्ह्यासाठी ८५७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून या घरकुलांसाठी १० कोटी २८ लाख ४० हजार रुपयांचा खर्च होणार आहे. या घरकुलांपैकी फलटण तालुक्यासाठी १३४ घरकुले मंजूर झालेली आहेत.

या बैठकीला आमदार दीपक चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तालुकानिहाय मंजूर घरकुलांची संख्या पुढीलप्रमाणे : जावली २३, कराड १००, खंडाळा व खटाव ५०, कोरेगाव ६१, महाबळेश्वर ३४, माण १००, पाटण १५०, फलटण १३४, सातारा १०५ व वाई ५० असे एकूण ८५७ घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे.

अनूसूचित जातीच्या व्यक्तींना त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:च्या उत्पन्नातून चांगल्या प्रकारचे पक्के घरे बांधणे शक्य होत नाही, पर्यायाने त्यांना झोपडीमध्ये वास्तव्य करावे लागते. ग्रामीण भागातील अनूसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवार्‍याचा प्रश्न सुटावा म्हणून लाभार्थ्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्चा घराच्या ठिकाणी पक्के घर देणे, हा शासनाचा मूळ उद्देश आहे.


Back to top button
Don`t copy text!