दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२१ । सातारा । गेली दोन वर्षे करोना संकटाचा मोठ्या निकराने सामना करण्यात यश आले. मात्र आता नव्याने आलेल्या “ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणखी सतर्क झाला आहे. विविध देशातून सातारा जिल्ह्यात आलेल्या 13 नागरिकांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले असून नागरिकांनी घाबरु न जाता प्रशासनाच्या सुचनांचे पालक करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
गेल्या दोन वर्षापासून सातारा जिल्हा प्रशासनाने करोना संकटाचा मोठ्या धीराने सामना केला आहे. या संकटात प्रशासनाला अनेक सामाजिक संघटनांनी पण मदत केली. अपुरे मनुष्यबळ, सुविधांचा अभाव असतानाही करोनावर नियंत्रण मिळवले आहे. जिल्हावासियांनीही प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सहकार्य केल्याने हे साध्य झाले आहे. सातारा जिल्ह्याने करोना लसीकरणात राज्यात चांगले काम केले आहे. परिणामी नागरिकांची भिती कमी झाली आहे. सध्य परिस्थितीत करोना पूर्णत: नियंत्रणात येत असतानाच “ओमायक्रॉन’ हे नवे संकट आले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबत नियमावली जारी केली असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे गौडा यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेत “ओमायक्रॉन’ बाधित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली असली तरी अद्याप सातारा जिल्ह्यात कुठेही संशयित आढळून आलेला नाही. परदेशातून आलेल्या 13 नागरिकांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले असून आरोग्य विभाग याबाबत आणखी सतर्क झाला आहे. प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन गौडा यांनी केले आहे.
करोनाची भिती कमी करण्यासाठी करोना लसीकरण जिल्ह्यात प्रभावीपणे करण्यात येत असून लसीकरणात जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्हा परिषदेने करोना आणि ओमायक्रॉन बाबत सतर्कता बाळगली आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये प्रवेश देण्यात येत असून मास्क, सॅनेटायझर, सोशल डिस्टन्सिंगबाबत दक्षता घेण्यात येत आहे. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल अशा कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याबाबतचा निर्णय प्रसंगी घेण्यात येणार आहे.
-विनय गौडा (मुख्य कार्यकारी अधिकारी)