126 प्रभागांतून 239 नगरसेवक यंदा निवडून येणार


दैनिक स्थैर्य । 14 जून 2025 । राज्य शासनाकडून महापालिका, पालिका व नगरपंचायतींना नव्याने प्रभागरचना कशी करावी, याबाबतच्या मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर होऊन निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. शासनाकडून नगरपालिकांना द्विसदस्यीय, तर नगरपंचायतींसाठी एकसदस्यीय प्रभागरचना निश्चित करण्यात आली असून, पालिका व नगरपंचातीच्या एकूण 126 प्रभागांतून 239 नगरसेवक यंदा निवडून येणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व मेढा नगरपंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाल पूर्ण झाला आहे. राज्यातील सत्ताबदल, ओबीसी आरक्षण व अन्य कारणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर गेल्या. प्रभागरचना, फेर आरक्षण काढूनही या निवडणुका अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिल्याने निवडणूक प्रक्रियेला आता गती आली आहे. राज्य शासनाने महानगरपालिकांसह नगरपालिका व नगरपंचायतींना नव्याने प्रभागरचना करण्याचे आदेश दिले असून, तशा मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत.

राज्य शासनाला निवडणूक आयोगाच्या मान्यतेने प्रभागरचना करावी लागणार असून, याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. प्रारूप प्रभागरचना तयार करणे, ती निवडणूक आयुक्त तथा प्राधिकृत अधिकार्‍याकडे मान्यतेसाठी पाठविणे, प्रारूप प्रभागरचनेस मान्यता देणे, प्रभागरचना प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना मागविणे, सुनावणीच्या अहवालासह अंतिम प्रभागरचना निवडणूक आयुक्त तथा प्राधिकृत अधिकार्‍याकडे मान्यतेसाठी पाठविणे. यानंतर अंतिम प्रभागरचनेस मान्यता देऊन ती प्रसिद्ध करणे असे प्रभागरचनेचे टप्पे असणार आहेत. निवडणूक आयोगाकडून लवकरच हा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो.निवडणुकीचे एकूण चार टप्पे असतात.

पहिला प्रभागरचनेचा, त्यानंतर आरक्षण सोडतीचा, तिसरा मतदार याद्या आणि चौथा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे. हे चारही टप्पे महत्त्वाचे असतात. हे सगळे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाला सुमारे तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक केव्हा जाहीर होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. असे असले तरी प्रभागरचनेच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आल्याने राजकीय मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.
जिल्ह्यातील मलकापूर पालिका व मेढा नगरपंचायत वगळता अन्य पालिकांनी प्रभागरचना व ओबीसी आरक्षण 2022 रोजी निश्चित केले आहे. त्यामुळे नगरपालिकांकडे प्रभागरचनेचा संपूर्ण डेटा उपलब्ध आहे. निवडणूक आयोगाने जर का पूर्वीची प्रभागरचना कायम ठेवली तर पालिकांमधील केवळ आरक्षण बदलू शकते. मात्र, याबाबत काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पालिका – प्रभाग – सदस्यसंख्या

  • सातारा – 25 -50
  • कर्‍हाड – 14 – 29
  • फलटण 13 – 27
  • वाई – 8 – 20
  • मलकापूर – 09 – 19
  • महाबळेश्वर – 10 – 20
  • पाचगणी – 08 – 17
  • रहिमतपूर – 10 – 20
  • म्हसवड 10 – 20
  • मेढा (नगरपंचायत) – 17 -17
  • एकूण – 124 – 239

Back to top button
Don`t copy text!