
स्थैर्य, 17 मार्च, सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा आहे. मोठे व मध्यम प्रकल्प असलेली धरणे ६० टक्केहून अधिक भरली, त्यामध्ये १२४ टीएमसी पाणीसाठा आहे. पिण्यासाठी, सिंचनासाठी तसेच विजनिर्मितीसाठी आठ धरणांतून ४ हजार ९५१ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. सध्या पिण्याच्या पाण्याबाबतची चिंता नसली, तरी उन्हाळा लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठा धरण प्रकल्प असलेल्या कोयना धरणात सध्या ६९.८५ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. कोयना धरणाची एकूण क्षमता १०५.२५टीएमसी असून, सध्या ते सुमारे ६६ टक्के भरलेले आहे. कोयना धरणावर सांगली जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र व राज्याच्या वीजनिर्मितीचा मोठा भाग अवलंबून असल्यामुळे हा धरणसाठा महत्त्वाचा मानला जात आहे.
याशिवाय उरमोडी धरणात ७ टीएमसी पाणी असून ते सुमारे ७० टक्के भरलेले आहे. तसेच कण्हेर धरणात ६.८५ टीएमसी पाणी असून, त्यामध्ये सुमारे ६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धोम धरणात ७.४० टीएमसी पाणीसाठा असून ते सुमारे ५४ टक्के भरलेले आहे. धोम-बलकवडी धरणात २.२७ टीएमसी पाणी असून त्यामध्ये सुमारे ५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तारळी धरणात सर्वात कमी पाणीसाठा आहे. या धरणाची एकूण क्षमता ५.८५ टीएमसी असून त्यामध्ये सध्या २.३४ टीएमसी पाणी आहे. म्हणजेच या धरणात ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या धरणातील लाभक्षेत्रात पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणारा आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये निरा-देवघर धरणात ७.५८ टीएमसी पाणी असून त्यामध्ये ६३ टक्के पाणीसाठा आहे. भाटघर धरणात १५.९७ टीएमसी पाणी असून ते सुमारे ६७ टक्के भरले आहे. तसेच वीर धरणात ५.२८ टीएमसी पाणी असून सुमारे ५३ टक्के पाणीसाठा आहे. मोठ्या व मध्यम प्रकल्पांचा विचार करता जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या एकूण सुमारे १२४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांमध्ये चांगला साठा निर्माण झाला असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीला परिस्थिती तुलनेने स्थिर आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात वाढ होत असल्याने पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने त्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच सिंचनासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्यावरही जलसंपदा विभागाने भर दिला आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक असला तरी आगामी उन्हाळा लक्षात घेता पाण्याचा वापर जपून करावा लागणार असल्याचे स्पष्ट आहे.
जिल्ह्यातील धरणांमधून पिण्यासाठी, सिंचनासाठी तसेच विजनिर्मितीसाठी आवर्तने सुरु करण्यात आली आहेत. त्याचबरोबर काही धरणांतून विजनिर्मितीसाठीही विसर्ग करण्यात येत आहे. त्यामध्ये कोयना विद्युत गृहातून २ हजार १०० क्युसेक्स, धोम धरणातून विद्युतगृहासाठी २८० क्युसेक, सियन द्वारातून ४८९ क्युसेक, उजवा कालवा १९० क्युसेक, डावा कालवा ५६५ क्युसेक, आसरे ४५० क्युसेक धोम बलकवडी धरणातून नदी विसर्ग ८ क्युसेक्स, इतर ३२८ क्युसेक; कण्हेर धरणातून विद्युत गृह ३४० क्युसेक, सिंचन द्वार ४० क्युसेक, उजवा कालवा १८० क्युसेक, डावा कालवा २०० क्युसेक; उरमोडी धरणातून नदी विसर्ग ५५ क्युसेक, विद्युत गृह ५५० क्युसेक, डावा कालवा ४९५ क्युसेक, तारळी धरणातून उजवा कालवा (कोपर्डे) १२४ क्युसेक, इतर ३२६ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. मध्यम प्रकल्पातील येरळवाडी उजव्या कालव्यातून २४ व डाव्या कालव्यातून १८ क्युसेक तसेच नेर धरणाच्या डाव्या कालव्यातून (आंधळी) ७० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. मोठे व मध्यम प्रकल्पातून एकूण ४ हजार ९५१ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
