स्थैर्य, सातारा, दि.८: महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांची लांबी सन 2014 मध्ये 5700 किमी होती. गेल्या सहा वर्षात ही लांबी जुलै-ऑगस्ट 2020 पर्यंत ती अधिक वाढून 17749 किलोमीटरपर्यंत गेली. ना. गडकरी यांच्यामुळे राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची गती वाढून सुमारे 12 हजार किमीने ही लांबी वाढली आहे. राज्यातील सर्व जिल्हे आता महामार्गांनी जोडली गेली आहेत.
राज्यात राष्ट्रीय महामार्गांच्या लांबीत सहा वर्षात एकूण 211 टक्के वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षाच्या काळात राष्ट्रीय महामार्गांची 520 कामे मंजूर करण्यात आली असून या कामांची लांबी 14450 किलोमीटर आहे. या कामाची एकूण किंमत 1 लाख 28 हजार 535 कोटी इतकी आहे. यापैकी 1100 किलोमीटरचे मार्ग हे सिमेंट काँक्रीटचे मंजूर करण्यात आले आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. दरवर्षी या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची आवश्यकता राहणार नाही.
आतापर्यंत महाराष्ट्रात 9281 किमी लांबीची कामे पूर्ण झाली असून 5260 किमी लांबीमध्ये कामे सुरु आहेत. बांधकामे पूर्ण झालेल्या कामांमध्ये काँक्रीटचे राष्ट्रीय महामार्ग 3433 किलोमीटर आहेत, तर उर्वरित कामे डांबरीकरणाची आहे. गेल्या सहा वर्षात राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी 70388 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
सन 2020-21 च्या नियोजन करताना या आर्थिक वषार्साठी 3232 कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर करण्यात आला असून या कामांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांना मंजुरी प्राप्त झाल्यानंतर ही कामे सुरु होणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य बांधकाम विभागाअंतर्गत आतापर्यंत 14 कामांच्या निविदांना अंतिम स्वरूप देण्यात आले असून या कामांची लांबी 87 किलोमीटर आहे. या कामांसाठी 532 कोटी रुपये खर्च येईल. पाच कामे निविदास्तरावर असून त्या कामांची किंमत 221 कोटी रुपये आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत 9 कामांच्या निविदा अंतिम करण्यात येणार असून या कामांची लांबी 400 किमी एवढी तर किंमत 7 हजार कोटी एवढी आहे. भारतमाला परियोजनेअंतर्गत 17 कामे मंजूर करण्यात येणार असून या कामांची लांबी 600 किमी एवढी आहे. अंदाज 9 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून तसेच राष्ट्रीय महामागार्अंतर्गत 7 कामे प्रस्तावित असून 305 किमी लांबीच्या या रस्त्यांसाठी 4500 कोटी रुपये लागतील. राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत 18 प्रकल्पाचे डीपीआर तयार करणे सुरू असून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाद्वारे 25 कामांचे डीपीअर प्रगतीपथावर आहेत.