दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । मुंबई । मुंबईतील मालमत्तांचा नवीन पुरवठा आणि विक्री यांच्यामध्ये एप्रिल आणि जून २०२२ मध्ये ४२ टक्के आणि १२ टक्के वाढ झाल्याचे ऑनलाइन रिअल इस्टेट कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉमने आरईएच्या सहयोगाने केलेल्या अलीकडील अहवालात दिसून आले. ग्राहकांच्या भावना शहरातील निवासी मालमत्तांबाबत सकारात्मक राहिल्या आहेत.
मुंबई शहरात एप्रिल-जून २०२२ च्या तिमाहीत विकल्या गेलेल्या २६१५० एककांसोबत राष्ट्रीय विक्रीच्या आकडेवारीत ३५ टक्क्यांचा सर्वाधिक वाटा घेतला गेला आहे. विक्रीचे मोठ्या प्रमाणावरील व्यवहार ठाणे पश्चिम, डोंबिवली, वसई, पनवेल आणि कल्याण अशा परिघावरील परिसरांमध्ये झाल्याचे या अहवालात दिसून आले.
हाऊसिंग डॉटकॉम आणि नारडेको या उद्योगातील संस्थेने केलेल्या संयुक्त अहवालात भाग घेतलेल्या मुंबईतील ४२ टक्के संभाव्य घर खरेदीदारांनी रिअल इस्टेटला त्यांचा प्राधान्याचा मालमत्ता वर्ग म्हणून गुण दिले. या सर्वेक्षणातून असेही दिसून आले की, अनेक ग्राहकांना मालमत्तेच्या किंमती वाढणे अपेक्षित आहे आणि त्यांच्या घर खरेदीच्या योजना अंतिम करण्यासाठी लवचिक पेमेंट योजना आणि सवलतीच्या ऑफर्सची गरज असते.
रूपये १-३ कोटी रूपयांच्या परिघात असलेल्या मालमत्तांना कमाल (२८ टक्के) मागणी असल्याचे मुंबईत दिसून आले. या वर्गातील सर्वाधिक विक्री ठाणे पश्चिममध्ये झाली. घरखरेदीदारांमध्ये १ बीएचकेला सर्वाधिक प्राधान्य राहिले आहे. त्यांनी मुंबईतील एकूण विक्रीमध्ये ५३ टक्क्यांचा सर्वाधिक वाटा उचलला आहे.
“मालमत्तेच्या किंमती वाढत असतानाही भारताच्या आर्थिक राजधानीतील ग्राहकांच्या भावना आशावादी आहेत. मागील काही महिन्यांत गृहकर्जावरील व्याजदरात थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. परंतु २०१९ मध्ये असलेल्या दरापेक्षा ते बरेच कमी आहेत. जागतिक साथीमुळे घरून काम करण्याला प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळे अनेक घर खरेदीदार घर आणि कार्यालय अशा दोन्ही प्रकारे काम करू शकतील अशा मालमत्तांचा विचार करू लागले आहेत,” असे मत हाऊसिंग डॉटकॉम, प्रोपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमचे समूह मुख्य वित्तीय अधिकारी श्री. विकास वाधवान यांनी व्यक्त केले.
“मुंबईचा तिमाही निवासी घर विक्रीचे आकारमान त्याच्या कोविड पूर्व पातळीच्या जवळ म्हणजे ९५ टक्क्यांपर्यंत आला आहे. एप्रिल-जून तिमाहीत १२ टक्क्यांची वाढ झाल्यानंतर हे शहर आपला विक्रीचा वेग कायम ठेवत आहे. त्यांना जुलै २०२२ मध्ये मालमत्तांच्या नोंदणीत सुदृढ १५ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईसाठीचा दृष्टीकोन शाश्वत अंतिम वापरकर्ता मागणीमुळे सकारात्मक राहिला आहे. परिघावरील परिसर जसे ठाणे पश्चिम, कल्याण- डोंबिवली आणि वसई विरार ही क्षेत्रे शहराच्या मालमत्ता बाजाराला पुढील काळात वेग देतील,” असे मत हाऊसिंग डॉटकॉम, प्रोपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमच्या संचालक आणि संशोधन प्रमुख श्रीमती अंकिता सूद यांनी व्यक्त केले.
एप्रिल-जून २०२२ तिमाहीत एकूण ४३२२० घरे बाजारात आणण्यात आली आणि त्या अनुषंगाने ४२ टक्क्यांची वाढ झाली. यातील अनेक नवीन युनिट्स ठाणे पश्चिम, डोंबिवली आणि बोरिवली अशा सूक्ष्म बाजारपेठांमध्ये आणण्यात आली.
मुंबईतील इन्व्हेंटरी ओव्हरहँगमध्ये ६४ महिन्यांपासून ३८ महिन्यांपर्यंतची सकारात्मक घट:
अहवालानुसार सर्वोच्च ८ शहरांमधील न विकल्या गेलेल्या एकूण ७.३७ लाख घरांपैकी ३६ टक्के घरे मुंबईत आहेत. मुंबई भारतातील ८ महत्त्वाच्या निवासी बाजारपेठांमध्ये विकल्या न गेलेल्या सर्वाधिक साठ्यावर असली तरी मालमत्तांची मागणी वाढू लागल्यामुळे मुंबईतील इन्व्हेंटरी ओव्हरहँग कमी झाला आहे. तो मागील वर्षाच्या याच कालावधीत ६४ टक्के होता आणि क्यू२ २०२२ मध्ये ३८ महिन्यांपर्यंत आला आहे. अंदाजित कालावधीतील इन्व्हेंटरी ओव्हरहँग विकासक बाजारातील न विकली गेलेली घरे सध्याच्या किंमतीत विकण्यास काढतात.