राजुरीतील व्यापाऱ्याला तब्बल १२ लाखांचा गंडा! शेवगा खरेदी करून संगमनेरच्या भामट्याने पैसे बुडवले; पैसे मागितल्यास ‘काय करायचं ते कर’ अशी उघड धमकी


राजुरी (ता. फलटण) येथील एका भाजीपाला व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून संगमनेरच्या व्यापाऱ्याने १२ लाख २५ हजार रुपयांचा शेवगा खरेदी करून त्याची घोर फसवणूक केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

स्थैर्य, राजुरी, दि. 16 मार्च : फलटण तालुक्यात शेतकरी आणि स्थानिक व्यापाऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याचे सत्र काही थांबायला तयार नाही. राजुरी (ता. फलटण) येथील एका भाजीपाला व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथील एका व्यापाऱ्याने तब्बल १२ लाख २५ हजार रुपयांचा शेवगा खरेदी करून त्याचे पैसे न देता गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कष्टाच्या पैशांवर थेट डल्ला मारल्याच्या या घटनेने शेतकरी आणि स्थानिक व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

या मोठ्या आर्थिक फसवणुकीची अधिकृत माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी लहू पांडुरंग भिसे (वय ३० वर्षे, रा. राजुरी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत फिर्याद नोंदवली आहे. लहू भिसे यांचा राजुरीमध्ये ‘महालक्ष्मी व्हेजिटेबल ट्रान्सपोर्ट आणि सप्लायर्स’ नावाचा व्यवसाय आहे. ते राजुरी, माळशिरस, फोंडशिरस, सदाशिवनगर, गिरवी परिसरातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला आणि विशेषतः शेवगा खरेदी करून तो मोठ्या व्यापाऱ्यांना विकण्याचे काम करतात.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, लहू भिसे यांची सुमारे एका वर्षापूर्वी अमोल मनसुब जोंधळे (रा. जोंधळेमळा, कोची, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) या परगावच्या व्यापाऱ्यासोबत ओळख झाली होती. दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी अमोल जोंधळे याने लहू भिसे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून मोठ्या प्रमाणावर शेवगा खरेदी करण्याची मागणी केली. सुरुवातीला त्याने विश्वासात घेण्यासाठी अत्यंत गोड बोलून व्यवहाराला सुरुवात केली.

दिनांक ११ जानेवारी ते २५ जानेवारी २०२६ या केवळ पंधरा दिवसांच्या कालावधीत अमोल जोंधळे याने लहू भिसे यांच्याकडून टप्प्याटप्प्याने हजारो किलोचा एकूण १६ लाख ६३ हजार ३३२ रुपये किमतीचा शेवगा खरेदी केला. या मोठ्या रकमेपोटी त्याने भिसे यांना केवळ ४ लाख ३८ हजार १७० रुपये ऑनलाईन माध्यमातून दिले. मात्र, उर्वरित तब्बल १२ लाख २५ हजार १६२ रुपयांची मोठी रक्कम देण्यास त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि भिसे यांच्याशी संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला.

ठरल्याप्रमाणे व्यापाऱ्याने पैसे न दिल्याने लहू भिसे यांनी त्याच्याशी वेळोवेळी फोनवरून संपर्क साधून आपल्या हक्काच्या पैशांची मागणी केली. मात्र, संगमनेरच्या या भामट्याने पैसे देण्यास चक्क नकार दिला. एवढेच नव्हे तर, “मला पैसे मागायचे नाहीत, तुला काय करायचे ते कर,” अशी उर्मट भाषेतील धमकीही त्याने भिसे यांना दिली. आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भिसे यांनी सर्व बिलांसह थेट पोलिसांत धाव घेतली.

या संतापजनक प्रकाराबाबत लहू भिसे यांनी शेवगा विक्रीच्या सर्व पावत्या आणि पुराव्यांसह तक्रार दिल्यानंतर, आरोपी अमोल मनसुब जोंधळे याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये विश्वासघात आणि आर्थिक फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परगावचे व्यापारी स्थानिक शेतकऱ्यांचा आणि छोट्या व्यापाऱ्यांचा असा गैरफायदा घेत असल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!