
दैनिक स्थैर्य | दि. 15 डिसेंबर 2024 | सातारा | श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १११ वा पुण्यतिथी महोत्सव येत्या सोमवारपासून (ता. १६) सुरू होणार आहे. या महोत्सवाच्या मुख्य दिवशी २५ डिसेंबरला पहाटे गुलालाचा कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवादरम्यान समाधी मंदिर समितीकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा ते वद्य दशमी अखेर होणारा हा पुण्यतिथी महोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्री महाराजांनी स्थापन केलेल्या श्री दत्त मंदिरात येत्या शनिवारी (ता. १४) संध्याकाळी दत्त जयंतीचा सोहळा संपन्न झाला आहे. तर रविवारी (ता. १५) समाधी मंदिरात पौर्णिमेचा सोहळा साजरा होणार आहे.
त्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य येत्या सोमवारी (ता. १६) पहाटे कोठीपूजन करून सुरुवात होणार आहे. ‘श्रीं’च्या समाधी मंदिर परिसरातील मुख्य सभामंडपात सोमवारी सकाळी सहा वाजता ‘श्रीं’च्या पादुका व प्रतिमेचे पूजन होऊन कोठीपूजन करण्यात येईल. या वेळी श्री महाराजांच्या पादुका व प्रतिमेसह श्री ब्रह्मानंद महाराजांच्या प्रतिमेचे व अक्षय बटव्याचे देखील पूजन करण्यात येईल. त्यानंतर स्वयंपाकगृहात चुलीचे पूजन करून अग्नी ज्वलंत करण्यात येईल, तसेच गोशाळेतील गायींचे पूजनही समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांच्या हस्ते करण्यात येईल.
श्री ब्रह्मानंद महाराजांनी घालून दिलेल्या रितीनुसार कोठीपूजन झाल्यानंतर ‘श्रीं’च्या पुण्यतिथी महोत्सवातील विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात येईल. या महोत्सवानिमित्त ‘श्रीं’च्या समाधी मंदिरात अखंड नामस्मरण व अखंड पहारा सुरू होईल, तर मुख्य सभामंडपात मान्यवरांची प्रवचन, कीर्तन, भजन, गायन आदी कार्यक्रम महोत्सव काळात सुरू राहतील. या महोत्सवादरम्यान रोज सकाळी ‘श्रीं’च्या पादुका व प्रतिमेची पालखी मिरवणूक ग्रामप्रदक्षिणेसाठी काढण्यात येणार आहे.
या महोत्सवाची सांगता २५ डिसेंबरला (बुधवारी) पहाटे पाच वाजून ५५ मिनिटांनी होणार आहे.दरम्यान, ‘श्रीं’च्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गोंदवल्यात दहा दिवस यात्रा भरणार आहे. भाविक व यात्रेकरूंसाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.