तिरकवाडी येथे लोकवर्गणीतून ११ बेडचे होम आयसोलेशन सेंटर सुरु : उपसरपंच नानासाहेब काळुखे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २५: कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन होम आयसोलेशन संकल्पनेंतर्गत कोरोना बाधीत रुग्णांसाठी तिरकवाडी ता. फलटण येथे कोरोना दक्षता कमिटी, ग्रामपंचायत तिरकवाडी व ग्रामस्थांचे प्रयत्नातून जयभवानी हायस्कूल येथे ११ बेडचे होम आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहिती उपसरपंच नानासाहेब काळुखे यांनी दिली आहे.

तिरकवाडी ता. फलटण व परिसरात कोरोना पेशंटची वाढती संख्या लक्षात घेऊन गावामध्ये होम आयसोलेशन सेंटर सुरु व्हावे यासाठी जयभवानी हायस्कूल, तिरकवाडी येथे २ वर्ग खोल्या उपलब्ध करुन देण्यात आल्यानंतर लोकवर्गणी व तिरकवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना बाधीत रुग्णांसाठी बेड व इतर साधने, औषधोपचार साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार अनेकांनी मदत व सहकार्य केल्याचे उपसरपंच नानासाहेब काळुखे यांनी निदर्शनास आणून दिले.

गावचे रहिवासी व णमोकार मेडिकल, फलटणचे संजयभई शहा यांनी ३ बेड, गावचे सुपुत्र व उस्मानाबाद वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांनी २ बेड, आनंदराव गोविंदराव सोनवलकर यांनी २ बेड, संभाजी शंकर शिंदे यांनी २ बेड, मुरलीधर गणपत नाळे (गुरुजी) यांनी १ बेड व ग्रामपंचायत तिरकवाडी सदस्या सौ. आरती महेश सोनवलकर पाटील यांनी १ बेड असे ११ बेड उपलब्ध करुन दिले आहेत.

तिरकवाडी ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेचे १९४६ सालचे इयत्ता ४ थी मधील माजी विद्यार्थी अतुल सोनवलकर, सिराज शेख, श्रीकांत बनकर, विशाल सोनवलकर, दस्तगीर शेख, प्रशांत काळभोर, पुरुषोत्तम नाळे, दीपक धोटे, श्रीकांत शिंदे यांनी ही संकल्पना समजल्यानंतर उत्स्फूर्तपणे पुढे येऊन ५ ऑक्सीमीटर, १० डिजीटल थर्मामीटर, २ बीपी चेक मॉनिटर, ४०० मास्क, २ कॅन सॅनिटायझर, २५ सॅनिटायझर स्प्रे व १० स्टीमर मशीन वगैरे साहित्य उपलब्ध करुन दिले आहे.

फलटण पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी होम आयसोलेशन सेंटरला भेट देवून प्रा. आरोग्य केंद्राच्या संबंधीत कर्मचाऱ्यांना होम आयसोलेशन सेंटरला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत तसेच आशा वर्कर यांना दररोज सकाळी रिडींग देणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर दिवसातून एकवेळ प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी या केंद्राला भेट देऊन रुग्णाची तपासणी करतील, कोरोना रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल अशी सोय करणेत आली आहे.

ज्यांना बाधीत असूनही फारसा त्रास नसल्याने घरी राहुन योग्य उपचार घेण्यास संमती देण्यात आली आहे परंतू घरी स्वतंत्र खोली, स्वतंत्र संडास बाथरुम सुविधा नाही अशा तिरकवाडी व परिसरातील बाधीत रुग्णांची येथे चांगली सोय झाली असल्याने आज २ कोविड बाधीत रुग्ण येथे दाखल झाले आहेत.

कोरोना विषाणू वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर लोक घरात थांबत नसल्याने प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात येणाऱ्या अडचणी या केंद्रामुळे दूर होऊन तिरकवाडी परिसरातील रुग्ण संख्या निश्चित कमी होईल असा विश्वास ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जयभवानी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे चेअरमन आनंदराव शितोळे, फलटण पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी याकामी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केल्याचे उपसरपंच नानासाहेब काळुखे यांनी सांगितले आहे.

तिरकवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ. पूजा पवार, उपसरपंच नानासाहेब काळुखे, ग्रामसेवक अंगराज जाधव, दुधेबावी प्रा. आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डाॅ. खंदारे, सिस्टर चांदगुडे, पोलीस पाटील अमोल नाळे, सदस्य सचिन नामदास, जयभवानी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य काळे, त्यांचे सहकारी महेश सोनलवकर, ज्योती नाळे, विलास सोनवलकर, प्रतिक जाधव, पुरुषोत्तम आडके व सचिन कदम, स्थानिक ग्रामस्थ व अनेकांनी यासाठी चांगले सहकार्य केले आहे.


Back to top button
Don`t copy text!