स्थैर्य, सातारा, दि.१४: तारळे, ता. पाटण येथील एका घरात जिल्हा विशेष शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून शौचालय आणि कारमध्ये लपवून ठेवलेल्या 103 किलो वजनाच्या 836 जिलेटीनच्या कांड्या हस्तगत केल्या. याप्रकरणी गोविंदसिंग बालुसिंग राजपुत (यादव) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात भारतीय स्फोटक कायदा अन्वये गोविंदसिंग बाळुसिंग राजपुत (यादव) याच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
याबाबत माहिती अशी, तारळे परिसरात बेकायदेशीररित्या स्फोटक पदार्थाचा साठा होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेला प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे जिल्हा विशेष शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने दिनांक 12 रोजी तारळे येथील गोविंदसिंग बालुसिंग राजपुत (यादव) याच्या घराची व आसपासच्या परिसराची झडती घेतली.
गोविंदसिंग बालुसिंग राजपुत (यादव) याच्या घराच्या पाठीमागील पत्र्याच्या कुलुपबंद शौचालयामध्ये खाकी रंगाचे चार बॉक्स आढळुन आले. बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीनच्या कांडया (स्फोटक पदार्थ) आढळुन आल्या. तसेच त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या पांढर्या रंगाच्या बोलेरो वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील सीटच्या खाली निळया रंगाच्या पिशवीमध्ये 29 जिलेटीनच्या कांडया व दुसर्या निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये 27 डीटोनेटर्स वायरसह आढळून आले.
याप्रकरणी पो. ना. सागर तानाजी भोसले यांनी आरोपी विरुध्द स्वतःच्या व लोकांच्या जिवितास धोका होऊ शकतो याची जाणीव असतानाही अधिकृत परवानगीशिवाय स्फोटक पदार्थांचा बेकायदेशीर साठा स्वतःजवळ बाळगून लोकवस्तीमध्ये ठेवल्याची फिर्याद दिली. त्यानुसार याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात भारतीय स्फोटक कायदा अन्वये गोविंदसिंग बाळुसिंग राजपुत (यादव) याच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तसेच 9 हजार 453 किंमतीच्या एकुण 836 जिलेटीनच्या कांडया वजन अंदाजे 103 किलो, 3 लाखाची पांढर्या रंगाची बोलेरो गाडी असा एकुण 3 लाख 9 हजार 453 रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखा सातारा व दहशतवाद विरोधी कक्षाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, पो.ना. सागर भोसले, सुमित मोरे, अनिकेत अहिवळे, केतन जाधव, निलेश बच्छाव हे कारवाईत सहभागी झाले होते.