स्थैर्य, पुणे, दि.२३: सीरम इन्स्टिट्यूटमधील नवीन इमारतीत गुरुवारी लागलेल्या आगीत ३ ते ४ मजल्यांवर नुकसान झाले आहे. कोरोना लस उत्पादन केंद्र दूर असल्याने त्याचे काहीही नुकसान झालेले नाही. त्यामुळे लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. या घटनेत बीसीजी, रोटा आणि इतर लसनिर्मिती साधनांचे नुकसान झाले आहे. कोविशील्ड लसीचा पुरवठा सुरळीत आहे. प्राथमिक अंदाजानुसार, भविष्यातील उत्पादन पाहता १ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी यांनी घटनास्थळची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या इमारतीमधील पहिले दोन मजले वापरात आहेत. कोविडची लस जिथे बनवली जाते, ते केंद्र दूर अंतरावर आहे. सीरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोविशील्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. मृत्यू झालेल्या कुटुंबाची जबाबदारी सीरम कंपनीने घेतली आहे. त्याशिवाय काही गरज पडली तर शासन निश्चित मदत करेल,
अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही
सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीच्या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला होता. या सर्वांची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.
महेंद्र इंगळे यांच्यावर अंत्यसंस्कार
अकोला : सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत गुदमरून मृत्यू झालेले महेंद्र प्रकाश इंगळे (३०) यांच्यावर चांदूरमध्ये शुक्रवारी अंत्यसंस्कार झाले. अभियंता असलेल्या महेंद्र यांना नवीन इमारतीच्या मेंटेनन्सच्या कामासाठी त्यांच्या कंपनीकडून पाठवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, आई-वडील, ३ विवाहित बहिणी असा परिवार आहे.