दैनिक स्थैर्य । दि.०७ जानेवारी २०२२ । सातारा । विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित छ. शाहू अकॅडमी अँड सायन्स जुनियर कॉलेज येथे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी लस घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे, त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी असे आवाहन याप्रसंगी केले.
छ. शाहू अकॅडमीमध्ये १५ ते १८ वयोगटातील विध्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी श्रीमंत छ. विक्रमसिंहराजे भोसले, प्राचार्य सौ. डिंपल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. लसीकरण मोहिमेत इ. १० ते १२ मधील एकूण ५६७ विद्यार्थ्यांचे लसीकरण यशस्वीपणे संपन्न झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक थोरात, डॉ. रसिका गोखले आणि सहकाऱ्यांनी लसीकरण मोहीम राबवली. छ. शाहू अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के लसीकरण करून एक आदर्श निर्माण केला. याबद्दल सौ. वेदांतिकाराजे आणि उपस्थित मान्यवरांनी सर्वांचे अभिनंदन केले.