स्थैर्य, नागपूर, दि.०३: ग्रामीण व शहरी भागातून सर्वाधिक ताण असणाऱ्या मेडिकलमध्ये 100 बेड आणखी उपलब्ध झाले असून ते रुग्णांसाठी कार्यरत झाले आहेत. तसेच कोरोनावर एकमेव पर्याय असणाऱ्या लसीकरणामध्ये नागपूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून ग्रामीण व शहर मिळून आता 237 केंद्रांवर लसीकरण सुरू झाले असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिली.
कोरोना संदर्भातील सद्यस्थिती व गेल्या पंधरा दिवसांपासून बैठकांच्या माध्यमातून केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी ऑनलाइन चर्चा केली. त्यानंतर माहिती देताना त्यांनी गेल्या काही दिवसातील सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 100 बेड आणखी उपलब्ध झाल्याची माहिती दिली. यामध्ये अतिदक्षता विभागातील 30, ऑक्सिजन सुविधा असणारे 30, सारी रुग्णांसाठी 10 व आज रात्री उशिरापर्यंत कार्यरत होणाऱ्या 30 अतिदक्षता अशा एकूण 100 बेडचा समावेश आहे. यापूर्वी 600 बेड मेडिकलमध्ये उपलब्ध होते. आता आणखी शंभर बेडची भर पडली असून पुढील काही आठवड्यांमध्ये ही संख्या एक हजार बेडपेक्षा अधिक असेल असे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना आजाराची घातकता व मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक ठरत असलेल्या लसीकरणात नागपूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. काल एका दिवसात नागपूर जिल्ह्यात 31 हजार 244 नागरिकांना लस देण्यात आली. जिल्ह्यामध्ये नागपूर शहरात 90 शासकीय तर 74 खाजगी अशा 164 केंद्रांना सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागांमध्ये 173 केंद्रांना सुरुवात झाली आहे. एकूण 237 केंद्र नागपूर जिल्ह्यामध्ये सुरू झाले असून दररोज तीस हजारावर लसीकरण होत असून नागरिकांनी कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरणामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
ग्रामीण भागातून येणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना नागपूर शहरातील व जिल्ह्यातील प्रमुख हॉस्पिटलमधील बेडची संख्या व अन्य माहिती उपलब्ध व्हावी यासाठी महानगरपालिकेप्रमाणेच कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. 0712-2562668 या क्रमांकावर संपर्क साधून ग्रामीण भागातील जनतेला आता मेयो मेडिकलसह अन्य हॉस्पिटलची माहिती उपलब्ध केली जाणार आहे.
ग्रामीण भागातील लोक प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी मौदा, रामटेक व नागपूर शहरातील इंदोरा भागातील आंबेडकर अनुसंधान केंद्र येथे नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा केली. बुटीबोरी येथे नव्याने लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती, खाण कर्मचारी, विद्युत निर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण व चाचणी करण्याचे निर्देशही आजच्या बैठकीत देण्यात आले.
ग्रामीण भागात खासगी डॉक्टरांकडे मोठ्या संख्येने या काळात रुग्ण जात आहेत. त्याची नोंद व कोरोना चाचणीची खातरजमा करण्याच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला आज निर्देश देण्यात आले. यापुढे ग्रामीण भागातील कोणत्याही खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णाची कोरोना चाचणी व लसीकरण झाल्याबाबतची नोंद ठेवली जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये लसीकरणासंदर्भात गैरसमज आहेत. काही अफवा पसरविल्या जात आहे. मात्र कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी व कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी लसीकरण प्रभावी असून त्यासाठी ग्रामीण भागात पोलिसांच्या मदतीने ‘लसीकरण मित्र ‘ उपक्रम राबविले जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी माध्यमांना दिली.
तत्पूर्वी आज झालेल्या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, वनामतीच्या संचालक मनीषा खत्री, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला,माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, आयएमएच्या अध्यक्ष अर्चना कोठारी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी व कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.