सजाई गार्डन येथे उभारणार १०० बेड्सचे कोरोना केअर सेंटर; फलटणकरांच्या मदतीला धावून आले उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १७ : सध्या फलटण मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आगामी काही दिवसांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. फलटण मध्ये असणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर आता ताण येवु लागला आहे. फलटण मध्ये सध्या बेड्स मिळणे सुद्धा अवघड झालेले आहे. हे जाणूनच फलटणकरांच्या मदतीला उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे हे धावून आलेले आहेत. नंदकुमार भोईटे यांच्या असणाऱ्या सजाई गार्डन मंगल कार्यालयात नंदकुमार भोईटे यांनी स्वखर्चाने १०० बेड्स असलेले कोरोना केअर सेंटर उभारून प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

फलटण येथील सजाई गार्डन मंगल कार्यालयात १०० बेड्सचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी घेतलेला आहे. सजाई गार्डन मंगल कार्यालयात उभारण्यात येत असलेल्या कोरोना केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गट विकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, आरोग्य व वैद्यकीय समितीचे सभापती सनी अहिवळे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, दादासाहेब चोरमले, तुषार नाईक निंबाळकर, राहुल निंबाळकर यांची उपस्थिती होती.

सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये साधारण दररोज १०० ते २०० रुग्ण हे कोरोनाबधित म्हणून आढळून येत आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाला सध्या जागेची व बेड्सची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत होती. हे लक्षात घेता सजाई गार्डन मंगल कार्यालय येथे १०० बेड्स तयार करून लवकरच प्रशासनाकडे हस्तांतरीत करणार आहे. भविष्य काळात गरज पडली तर सजाई गार्डन येथेच अजून बेड्स आपण उपलब्ध करून देवू, अशी ग्वाही उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी दिली.

सध्या फलटणमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हेच लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद असून समाजातील अजून दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी केलेले आहे.

फलटण शहरामध्ये अजून बरेच ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभे करणे हे गरजेचे आहे. उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांच्या प्रमाणे दानशूर व्यक्तींनी पुढे येवून कोरोना केअर सेंटर साठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केलेले आहे.

उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी पुढे येऊन सजाई गार्डन येथे कोरोना केअर सेंटर सुरू करत आहेत. नंदकुमार भोईटे यांनी घेतलेला निर्णय हा निर्णय स्तुत्य असून आगामी काळात जर गरज लागली तर अजून बेड्स हे सजाई गार्डन येथे नंदकुमार भोईटे हे उपलब्ध करून देतील यात कसलीही शंका नाही, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी केले.

 


Back to top button
Don`t copy text!