कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने शिबीराचा 10 हजार 925 दिव्यांग व ज्येष्ठांनी घेतला लाभ


दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । सातारा । जिल्ह्यातील सर्व गरजू दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयवे व सहाय्यभूत साधने पुरविण्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये 15 ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मोजमाप शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरांचा 5 हजार 481 दिव्यांगांनी तर 5 हजार 444 ज्येष्ठ नागरिकांनी असे एकूण 10 हजार 925 लाभार्थ्यांनी  लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेनुसार गरजु दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारचे कृत्रिम अवयवे व सहाय्यभूत साधने आवश्यकतेनुसार मंजुर करुन ते बसविण्यात येणार आहे.

आयोजित करण्यात आलेल्या शिबीरामध्ये सातारा तालुक्यातील 1 हजार 274 दिव्यांग व 985  ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे. कराड तालुक्यातील 2 हजार 120 दिव्यांग तर 1 हजार 834 ज्येष्ठ नागरिक, फलटण तालुक्यातील 1 हजार 320 दिव्यांग तर 1 हजार 801 ज्येष्ठ नागरिकांनी, वाई तालुक्यातील 474 दिव्यांग तर 677 ज्येष्ठ नागरिकांनी व महाबळेश्वर तालुक्यातील 293 दिव्यांगांनी तर 147 ज्येष्ठ नागरिक असे एकूण 5 हजार 481 दिव्यागांनी तर 5 हजार 444 ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे.

दुसऱ्या टप्प्यात पाटण, माण, खटाव, कोरेगाव, जावली व खंडाळा या सहा तालुक्यामध्ये मोजमाप शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!