स्थैर्य,मुंबई, दि ११: २३ नोव्हेंबरपासून राज्यातील ९ ते १२ वी इयत्तेचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होत आहेत. मात्र त्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. सुमारे १० लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता आठवडाभरात स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी शाळा सुरू करण्याची एसओपी जारी केली. त्यात १ ते १२ वीपर्यंतच्या राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीचे बंधन आहे. तसेच ही चाचणी १७ ते २२ नोव्हेंबर या कालावधीची असावी आणि नकारात्मक चाचणीचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीस सादर करण्यास बजावण्यात आले आहे.
अशी आहे एसओपी:
प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांची लेखी संमती हवी. एका बाकावर एक विद्यार्थी बसवावा. क्रीडा, स्नेहसंमेलन रद्दच असावे. स्कूल बस, शाळा दररोज निर्जंतुक कराव्यात. हात धुण्याची व्यवस्था हवी. विद्यार्थ्यांना हजेरीचे बंधन नसावे. ऑनलाइन व ऑफलाइन वर्गाचे वेळापत्रक स्वतंत्र असावे.
सर्व शिक्षकांनी शाळेत करायचे काय?
कोरोना चाचणीस विरोध नाही. मात्र ९ ते १२ वी वर्ग भरत असताना सर्व शिक्षकांनी शाळेत जाऊन करायचे काय, मग ऑनलाइन वर्ग कसे चालणार आणि १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना कोण शिकवणार, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबेरे यांनी उपस्थित केला.