
राज्याच्या अर्थसंकल्पात फलटण तालुक्यातील हिंगणगाव जिल्हा परिषद गटासाठी तब्बल १० कोटी ९५ लाख रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. याबद्दल जि.प. सदस्या सौ. किरणताई नलवडे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे आभार मानले आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. 12 मार्च : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फलटण तालुक्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी भरगच्च असा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामध्ये हिंगणगाव जिल्हा परिषद गटासाठी तब्बल १० कोटी ९५ लाख रुपयांचा घसघशीत निधी मंजूर करण्यात आला आहे. या भरघोस निधीबद्दल हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील जनतेच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या सौ. किरणताई नलवडे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर व स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार मानले आहेत.
विकासासाठी आम्ही कटिबद्ध : सौ. किरणताई नलवडे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून फलटण तालुक्याच्या विशेषतः हिंगणगाव जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी सुमारे ११ कोटींचा (१० कोटी ९५ लाख) निधी मंजूर केल्याबद्दल हिंगणगाव गटातील नागरिकांच्या वतीने सौ. किरणताई नलवडे यांनी या सर्व नेत्यांचे विशेष अभिनंदन करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगणगाव जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध असल्याचे मतही सौ. किरणताई नलवडे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
मंजूर करण्यात आलेला विकास निधी आणि रस्ते
मंजूर करण्यात आलेल्या या कोट्यवधींच्या निधीतून गटातील अनेक महत्त्वपूर्ण रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने आरडगाव ते हिंगणगाव (आझाद चौक) रस्ता सुधारणा व काँक्रीट गटर करण्यासाठी सर्वाधिक ३ कोटी रुपये आणि सालपे रेल्वे क्रॉसिंग लाईन ते लोणंद-सातारा हायवे रस्ता सुधारणेसाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच हिंगणगाव ते भुरकरवाडी रस्ता सुधारणेसाठी १ कोटी २० लाख रुपये तर ढवळ ते मानेवाडी रस्ता सुधारणेसाठी १ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत.
यासोबतच आदर्की बुद्रुक येथे फलटण-सातारा कॉर्नर रस्ता ते खराडेवस्ती रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी ७५ लाख रुपये, ताथवडा ते शिंदेमाळ रस्ता सुधारणेसाठी ५० लाख रुपये, सासवड काळज रस्ता ते माळीबेंद सासवड रस्ता काँक्रीटीकरणासाठी ५० लाख रुपये आणि सासवड वडाचामळा ग्रा.मा. ३०५ सुधारणा व प्रजिमा ४ ते हरिजनवस्ती रस्ता काँक्रीटीकरणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त आळजापूर केंजळेवस्ती ते भैरवनाथ मंदिर ते शिंदेवस्ती रस्ता सुधारणेसाठी ५० लाख रुपये आणि तांबवे हरिजनवस्ती रस्ता ग्रा.मा. २९८ सुधारणा (भाग रा.मा. ११७ ते तांबवे रस्ता) करण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या सर्व कामांमुळे हिंगणगाव गटातील दळणवळणाचा प्रश्न सुटून विकासाला मोठी गती मिळणार आहे.
