स्थैर्य, दि.२९: दिवाळी सणानिमित्त प्रवासी गर्दीत वाढ होणे अपेक्षित आहे. त्यानुसार वाढती मागणी लक्षात घेऊन, एसटी महामंडळाने दि. 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे 1 हजार विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार असुन, त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली आहे. आगाऊ आरक्षणासाठी प्रवासी बंधु-भगिणीनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
एसटी महामंडळामार्फत दिवाळी सणानिमित्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दरवर्षी नियमित बस फेऱ्या व्यतिरिक्त जादा फेऱ्या सोडण्यात येतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने जादा बस फेऱ्या सुरु करण्याचे नियोजन केले आहे. अर्थात,राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यकत्या सर्व सूचना व नियमांचे काटेकोर पालन करीत सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाच्या मुख्यालयातून दिले आहेत. या बाबतीत प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन दिवाळी सणानिमित्त होणारी जादा वाहतूक निर्विघनपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत स्थानिक आगाराला दिल्या आहेत.