स्थैर्य, मुंबई, दि. १२: कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाला विळखा घातलेला आहे, संकटाच्या या काळात आपण सर्वांनी एक देश म्हणून एकजूट होऊन प्रत्येक गरजवंताला मदत करणे आवश्यक आहे. हा विचार डोळ्यासमोर ठेऊन मॅनकाइंड फार्मा व अनिल कपूर यांनी हातमिळवणी केली असून कोविड-१९ विरोधातील लढ्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये १ कोटी रुपये दान केले. रक्कम दान देण्याबरोबरीनेच बॉलिवूडचे सुपरस्टार अनिल कपूर यांची टीम व मॅनकाइंड फार्मा यांनी पुढाकार घेऊन मुंबई पोलिसांना हेल्थ ओके मल्टिव्हिटॅमिन पॅकेट्सचे वाटप केले. त्यांनी जुहू, डी एन नगर, वर्सोवा, खार, वांद्रे व एसीपी कार्यालये या भागांना या उपक्रमाचा लाभ मिळाला.
परिस्थिती विपरीत असताना देखील हे फ्रंटलाईन योद्धे सातत्याने आपले कर्तव्य बजावत आहेत, प्रत्येक गरजवंताला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत व संकटकाळात सार्वजनिक सुरक्षिततेसाठी कसून प्रयत्न करत आहेत. अशावेळी त्यांचे आरोग्य चांगले राखले जाणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, स्वतःची रोगप्रतिकारशक्ती वाढवून त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवले पाहिजे. हेल्थ ओके हा जबाबदारीचे भान राखून काम करणारा ब्रँड असून त्यांनी आपल्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना अधिक चांगली रोगप्रतिकारशक्ती पुरवून त्यांची मदत करण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे.
बॉलिवूडचे सुपरस्टार अनिल कपूर यांनी सांगितले, ‘या समाजोपयोगी उपक्रमासाठी मॅनकाइंड फार्मासोबत हातमिळवणी करताना मला अतिशय आनंद होत आहे. सध्याच्या या अभूतपूर्व काळात समाजाची मदत करण्यासाठी मॅनकाइंड फार्माने सातत्याने पुढाकार घेऊन आपल्या क्षमतेप्रमाणे सर्वतोपरी साहाय्य केले आहे. आज या निमित्ताने मी ब्रॅंडविषयी माझ्या मनात असलेली कृतज्ञतेची भावना व्यक्त करू इच्छितो, आपल्या फ्रंटलाईन योद्ध्यांच्या निर्भीड योगदानाचा या ब्रॅंडने नेहमीच सन्मान केला आहे.’
मॅनकाइंड फार्माचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष श्री. राजीव जुनेजा म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये १ कोटी रुपयांची मदत हे समाजाच्या कल्याणासाठी आम्ही उचललेले एक छोटे पाऊल आहे. या सत्कार्यात आमची साथ देत असल्याबद्दल आम्ही सुपरस्टार अनिल कपूर यांचे आभारी आहोत. त्यांचा सहयोग एवढ्यावरच मर्यादित नसून श्री. अनिल कपूर व त्यांच्या टीमने मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्थ ओके पॅकेट्सचे वाटप केले आहे. या महामारीमध्ये निस्वार्थ योगदान देत असल्याबद्दल आम्ही सर्व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक ऋणी आहोत.’
मॅनकाइंड फार्माने नुकतेच १०० कोटी रुपये दान केले, महामारीमध्ये इतरांचे प्राण वाचवताना स्वतःचा जीव गमवावा लागलेल्या डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, फार्मासिस्ट्स आणि इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसहित सर्व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी कंपनीने ही मदत केली आहे. कोविड-१९ संकटकाळात मॅनकाइंड फार्मा आपल्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना आणि सर्व गरजू समाजाला मदत करण्यासाठी संपूर्णतः वचनबद्ध आहे.