दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । फलटण । श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव मुरुम, ता. फलटण व परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र शासन स्तरावर मान्यता प्राप्त झाली असून पहिल्या टप्प्यात शासनाने १ कोटी ६१ लाख ३१ हजार रुपये निधीची तरतूद व आराखडे अंदाजपत्रक मंजूर केले आहेत.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यासाठी ठोस भूमिका घेवून मुरुम व परिसर विकासाला प्राधान्य दिले आहे. आगामी काळात येथे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे भव्य स्मारक उभारुन या शूर वीर लढवय्या पुरुषाची माहिती, त्यांचे पराक्रम, त्यांनी लढलेल्या विविध लढाया व त्यामधील विजयश्री या स्मारकाच्या माध्यमातून तरुण पिढीसमोर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मुरुम व परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करताना मुरुम येथे भक्त निवास, सभा मंडप, नीरा नदी घाट वगैरे कामांचे नियोजन करुन आराखडा अंदाज पत्रकानुसार १ कोटी ६१ लाख ३१ हजार रुपये मंजूर करण्यात आले, त्यापैकी ७० लाख रुपये गत वर्षी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, उर्वरित ९१ लाख ३१ हजार रुपये आता उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे आराखड्यातील उर्वरित कामे गतीने पूर्ण करुन घेण्याच्या सूचना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संबंधीत यंत्रणांना दिल्या आहेत.
अंदाज पत्रक आराखड्यानुसार मुरुम येथे भक्त निवास बांधणे ५० लाख ३४ हजार रुपये, सभामंडप बांधणे २८ लाख ३९ हजार रुपये, शौचालय बांधणे ८ लाख ३८ हजार रुपये, रस्त्याकडेला बंदिस्त गटार बांधणे १० लाख ३० हजार रुपये, नीरा नदी घाट बांधणे ३० लाख ३० हजार रुपये, मुरुम मधील अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण २९ लाख २८ हजार रुपये आणि गावात पथ दिवे (स्ट्रीट लाईट) बसविणे ४ लाख ३२ हजार रुपये असे एकूण १ कोटी ६१ लाख ३१ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
त्यापैकी ७० लाख गतवर्षी उपलब्ध झाल्यानंतर मंजूर कामांना सुरुवात करण्यात आली, यावर्षी ९१ लाख ३१ हजार उपलब्ध झाले आहेत त्यामुळे आराखड्याप्रमाणे उर्वरित कामे लवकर पूर्ण करुन घेण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.