स्थैर्य, सातारा, दि.२९: फलटण व खटाव तालुक्यात जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुसेगाव परिसरातून अटक केली. रितेश सतीश भोसले वय 20 वर्षे रा भाटमवाडी, ता. खटाव आणि कोहिनुर झाकीर काळे वय 22 वर्षे रा. मोळ, ता. खटाव अशी त्यांची नावे आहेत.
सातारा जिल्हयातील उघडकीस न आलेले जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक यांनी एलसीबीला दिल्या होत्या. त्यानुसार विशेष पथक तयार केले आहे. दरम्यान, २७ मे २०२१ रोजी पुसेगाव परिसरामध्ये राहणाऱ्या पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांनी फलटण व खटाव तालुक्यात जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत, अशी माहिती प्राप्त झाल्याने बातमीची शहानिशा करुन पुढील कार्यवाही करण्यासाठी पथकाने २७ मे २०२१ रोजी पुसेगाव परिसरामध्ये जावून नमुद इसमांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल व कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता त्यांनी दहिवडी पोलीस स्टेशनच्या हददीत जबरी चोरीचा १, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हददीत घरफोडीचा १ तसेच औंध पोलीस स्टेशनच्या हददीत घरफोडीचे २ असे एकुण ४ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांना पुढील कार्यवाही कामी फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गु.र.नं .२०१ / २०२१ भादविक ४५७ , ३८० या गुन्हयाचे तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनाप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहा.फौजदार जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, तानाजी माने, पो.हवा.सुधीर बनकर, कांतीलाल नवघणे, संतोष सपकाळ, संतोष पवार, मोहन नाचण, पो. ना. शरद बेबले , साबीर मुल्ला , मंगेश महाडिक , नितीन गोगावले , प्रविण फडतरे , रवि वाघमारे , अर्जुन शिरतोडे , निलेश काटकर , गणेश कापरे , राजकुमार ननावरे , पो.कॉ.केतन शिंदे , वैभव सावंत , सचिन ससाणे , विशाल पवार , संकेत निकम , रोहित निकम , विक्रम पिसाळ , प्रविण पवार , चा.पो.कॉ.विजय सावंत यांनी कारवाई केली आहे.