दैनिक स्थैर्य । दि.०७ जानेवारी २०२२ । मुंबई । रत्नागिरी जिल्ह्यातील जाकिमिऱ्या येथील कै. डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकासाठी शासनाने १ कोटी ५६ लाख रुपयांच्या प्रस्तावाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून या स्मारकाचे उर्वरित काम मे २०२२ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिले.
जाकिमिऱ्या (जि. रत्नागिरी) येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार डॉ. राजन साळवी, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस समितीचे राज्य समन्वयक प्रा. विनय खामकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकातील बहुउद्देशीय सभागृह आणि वाचनलाय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या स्मारकातील सुशोभीकरण, संरक्षक भिंत, डॉ. बाळासाहेब सावंत यांचे स्मृतिशिल्प आणि विद्युतीकरणाचे काम मे २०२२ अखेर पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या. स्मारकाची इमारत अद्ययावत राहण्याच्या दृष्टीने देखभाल दुरुस्तीकरिता ही इमारत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यासाठी शासनस्तरावरून आवश्यक ती परवानगी देण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.