
स्थैर्य, फलटण, दि. १३ सप्टेंबर: मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील तीन मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी ६ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार सचिन पाटील यांनी दिली. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी उपलब्ध झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
या मंजूर निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुलांचा प्रश्न मार्गी लागणार असून, विशेषतः पावसाळ्यात होणारी नागरिकांची मोठी गैरसोय टळणार आहे. आमदार सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे व लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
मंजूर झालेली कामे व निधी खालीलप्रमाणे:
- फडतरवाडी: फडतरे वस्ती रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी २६१.७२ लाख रुपये.
- ढवळपाटी: ढवळपाटी ते बीबी रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी २३८.४३ लाख रुपये.
- सावंतवाडी: सावंतवाडी रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी १९८.५५ लाख रुपये.
यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले, “तालुक्यातील राजकारणाची दिशा बदलल्यानंतर आम्ही विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. आमदार झाल्यापासून गावगाडा, रस्ते, पूल आणि पाणंद रस्त्यांची अनेक कामे मार्गी लावली असून, तालुका खड्डेमुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे”.
या निधीबद्दल आमदार सचिन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फलटण तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.