फलटणमध्ये सत्तांतर; रामराजेंचा गड खालसा, समशेरसिंह नगराध्यक्ष


फलटण नगरपालिकेत ३५ वर्षांनी सत्तांतर. भाजपचे समशेरसिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्षपदी विजयी. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सत्तेला सुरुंग. वाचा सविस्तर निकाल.

स्थैर्य, फलटण, दि. २१ डिसेंबर : फलटण नगरपरिषदेच्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवत मागील ३५ वर्षांची एकहाती सत्ता उलथवून लावली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रणनीतीला मोठे यश आले असून, भाजपचे उमेदवार समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर हे ‘लोकनियुक्त नगराध्यक्ष’ म्हणून विजयी झाले आहेत. जनतेने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती) ला स्पष्ट बहुमत दिले आहे.

३५ वर्षांचा गड ढासळला

विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची गेल्या ३५ वर्षांपासून फलटण नगरपरिषदेवर एकहाती सत्ता होती. मात्र, यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही सत्ता खेचून आणत रामराजेंना जोरदार धक्का दिला आहे. या निकालामुळे फलटणच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाले आहे.

हाय व्होल्टेज लढतीत अनिकेतराजेंचा पराभव

नगराध्यक्षपदासाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट सामना झाला. या लढतीत मतदारांनी समशेरसिंह यांच्या बाजूने कौल दिल्याने अनिकेतराजे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

रणजितसिंहांची रणनीती यशस्वी

गेल्या वर्षभरापासून रामराजे यांच्या गटातील अनेक बडे आणि जाणते चेहरे पक्ष सोडून भाजपच्या गळाला लागले होते. रामराजे यांनी या पडझडीकडे कानाडोळा केल्याचे बोलले जात होते. नेमकी हीच संधी साधत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अचूक रणनीती आखली आणि सत्तेला सुरुंग लावला. दिग्गज नेत्यांचे पक्षांतर आणि रणजितसिंहांचे सूक्ष्म नियोजन भाजपच्या पथ्यावर पडले आहे.

उद्या वाचा विशेष विश्लेषण :

“श्रीमंत रामराजेंच्या ‘चांडाळ चौकडी’मुळेच अनिकेतराजे पराजित?”

निवडणुकीतील या मोठ्या पराभवामागे नेमकी कोणती कारणे आहेत? रामराजेंच्या बंगल्यातील ‘चांडाळ चौकडी’मुळेच कोणत्या निर्णयांमुळे अनिकेतराजेंना फटका बसला? याचे सविस्तर विश्लेषण उद्या प्रसिद्ध केले जाईल.


Back to top button
Don`t copy text!