हॉटेलचालकास मारहाण करून लूट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । सातारा । निसराळे फाटा येथील चालवत असलेले हॉटेल बंद कर अशी धमकी देत हॉटेलचालकाला बेदम मारहाण करून त्याच्याजवळील ६०,२०० रुपये जबरीने चोरून नेल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात अतीत (ता.सातारा) येथील गणेश कारंडे याच्यासह अज्ञात एकाविरोधात जबरी चोरीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद हॉटेलचालक संभाजी प्रल्हाद यादव (वय.३३,रा.वेणेगाव,ता.सातारा) यांनी दिली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संभाजी यादव हे निसराळे फाटा येथे भाडेतत्त्वावर हॉटेल चालवत आहेत.गुरुवारी दुपारी त्यांनी त्यांच्या सासऱ्यांकडून हातउसाने म्हणून ६० हजार रुपये घेतले होते.सायंकाळी ७ वाजता ते हॉटेल बंद करून एका ग्राहकाची बाकी असलेली उधारी घेण्यासाठी त्यांच्या दुचाकीवरून खोडद गावच्या रस्त्याने निघाले होते.वाटेत लघुशंका आल्याने ते रस्त्याकडेला गाडी लावून थांबले.

त्याचवेळी एका दुचाकीवरून तोंडाला मास्क लावून दोन व्यक्ती तेथे आल्या.दोघांनी त्यांना प्लास्टिकच्या जाड पाईपने अचानक मारण्यास सुरवात केली.यावेळी झालेल्या झटापटीत संभाजी यादव यांनी एकाचा मास्क खाली खेचला.तो अतीत गावचा गणेश कारंडे असल्याचे निदर्शनास आले.संभाजी यादवांनी “तुम्ही मला का मारताय?असे विचारले.त्यावेळी “निसराळे फाट्यावरील तुझे हॉटेल बंद कर.मला तेथे ऑनलाइन लोटरीचा व्यवसाय करायचा आहे” असे गणेश कारंडे याने सांगितले व दोघांनी पुन्हा त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.यावेळी गणेश कारंडे याने शिवाजी यादव यांच्या गुप्तांगावर जोराने लाथ मारल्याने ते जागीच कोसळले.यावेळी गणेश कारंडे याने त्यांच्या खिश्यात असलेले ६०,२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले व हॉटेल बंद नाही केलेस तर तुला वेणेगावत येऊन भोकसून मारेंन अशी धमकी देत दोघांनी तेथून पलायन केले.

मारहाणीचा घटना संभाजी यादव यांनी कुटुंबियांना सांगितल्यावर कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.मारहाणीत संभाजी यादव यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्यामध्ये व डाव्या हाताच्या कोपऱ्यात फ्रॅक्चर झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार एफ.एच.शेख करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!