हेमंत नगराळे यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । मुंबई । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात महाविकासआघाडी आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोप, कुरघोडीच्या राजकारणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरील व्यक्ती ही सातत्याने चर्चेत राहिली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ठाकरे सरकारला गोत्यात आणल्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदाचा कारभार हेमंत नगराळे  यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये भाजप नेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात असमर्थ ठरल्यामुळे हेमंत नगराळे यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे. एकीकडे केंद्रीय तपासयंत्रणांनी महाविकासआघाडीचे मंत्री आणि नेत्यांविरुद्ध कारवाईचा सपाटा लावला असताना हेमंत नगराळे भाजप नेत्यांविरुद्धच्या आरोपांनंतर कारवाई करताना फारशी तत्परता दाखवत नव्हते. त्यामुळेच हेमंत नगराळे यांचीराज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करून त्यांना एकप्रकारे साइड पोस्टिंग दिल्याचे बोलले जात आहे. तर ठाकरे सरकारच्या मर्जीतील संजय पांडे यांच्याकडे मुंबईच्या आयुक्तपदाचा कारभार देण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या निवृत्तासाठी अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या काळात संजय पांडे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते.

हेमंत नगराळे हे १९८७च्या आयपीएस बॅचचे अधिकारी होते. परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यामुळे ठाकरे सरकारची प्रतिमा मलीन झाली असताना हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या आयुक्तपदाचा कारभार देण्यात आला होता. परंतु, हेमंत नगराळे भाजप नेत्यांविरुद्ध कारवाई करताना ठाकरे सरकारला अपेक्षित असणारी तत्परता दाखवत नव्हते, असे सांगितले जाते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मध्यंतरी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या अनेक नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यानंतर हेमंत नगराळे यांनी तातडीने भाजपच्या संबंधित नेत्यांवर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु, हेमंत नगराळे त्यामध्ये अपयशी ठरले. एकीकडे केंद्रीय यंत्रणा महाविकासआघाडीतील मंत्र्यांना लक्ष्य करत असताना हेमंत नगराळे यांची ‘निष्क्रियता’ आणि मौन त्यांच्या गच्छंतीस कारणीभूत ठरले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका नेत्याने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिली.

संजय पांडे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावर नियुक्ती झालेले पांडे यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी होती. मात्र, न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी असलेले संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन दूर करत त्यांना होमगार्डचे प्रमुखपद दिल्यानंतर संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले. हेच त्यांच्या नाराजीचे कारण होते. त्यांच्या नाराजीनंतर पांडे यांची नेमणूक महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदावर करण्यात आली होती.


Back to top button
Don`t copy text!