स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा – ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२२ । मुंबई । “सध्याच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करूनच आपला स्पर्धेमध्ये टिकाव लागू शकतो”, असे मत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या १७ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजिलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात श्री. वाघमारे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापारेषणचे संचालक (संचलन) अनिल कोलप, संचालक (प्रकल्प) नसीर कादरी, संचालक (वित्त), अशोक फळणीकर, संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे उपस्थित होते.

“आपली कंपनी जोपर्यंत कात टाकत नाही, तोपर्यंत या खासगी कंपन्यांसमोर आपला टिकाव लागणार नाही. महापारेषणने ड्रोनच्या साहाय्याने काम करण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नव्या संकल्पनेचा अवलंब केला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे,” असेही श्री.वाघमारे म्हणाले.

सुरूवातीला प्रास्ताविकात श्री.गमरे म्हणाले, “कंपनीची संस्कृती व कर्मचाऱ्यांमध्ये एकसंघ वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येणे, सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणे, मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून कंपनीचा विकास साधावा, या हेतूने महापारेषणतर्फे कंपनीचा १७ वा वर्धापनदिन व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा त्यामागचा हेतू आहे”.

यावेळी ऊन-पावसाची तमा न बाळगता विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्री.वाघमारे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापारेषणचे मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) सुधीर वानखेडे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन, मनुष्यबळ नियोजन) राजू गायकवाड, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील, राजशिष्टाचार अधिकारी सतिश जाधव, अधीक्षक अभियंता (प्र.) योगेश पाचपांडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे, संचालक (मानव संसाधन) यांचे विशेष कार्य अधिकारी महेश आंबेकर यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला राज्यातील विविध परिमंडळातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!