दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२२ । सातारा। बोगदा परिसरातील एका पुलाचे रुंदीकरण करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांना तब्बल पाच वर्षे लागली आणि माझे काम नगराध्यक्षांनी आडवले असा आरोप ते करतात . असे आरोप त्यांनी खाजगीत केले असते तर समजू शकले असते मात्र त्यांनी नगराध्यक्षांवर केलेली टीका आघाडी प्रमुखांचे हे सरळ सरळ अपयश आहे . त्यामुळे राजेशिर्के यांची टीका ही सातारा विकास आघाडीचे अब्रू चव्हाट्यावर मांडणारी आहे असा जळजळीत टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता लगावला.
शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली . माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशर्के यांच्या वॉर्डातील दोन पुलांना डीपीडीसी मधून 50 लाखांचा निधी प्राप्त झाला त्या वेळी पत्रकारांशी बोलताना माझी कामे नगराध्यक्ष माधवी कदम यांनी अडवली असा आरोप त्यांनी केला होता या आरोपावर नगराध्यक्षांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही मात्र या आरोप-प्रत्यारोपांचा संदर्भ घेऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मात्र आघाडीला चांगलेच टार्गेट केले.
ते पुढे म्हणाले आम्ही सातत्याने बोगदा मार्गे कारखान्याकडे जात असतो तेथे पुलाच्या रुंदीकरणाची मोठे मोठे फ्लेक्स पाहायला मिळाले . मात्र एका पुलाच्या रुंदीकरणासाठी यांना पाच वर्षे लागली आणि माझी कामे नगराध्यक्षांनी अडवली असा आरोप केला किमान त्यांनी तो आरोप खाजगीत केला असता तर समजू शकले असते . मात्र त्यांनी जाहीररीत्या आरोप केल्याने प्रत्यक्षात आघाडीत काय चाललंय हे समोर आले आहे . हेच आघाडीप्रमुख यांचे मोठे अपयश असून टेंडर व्यतिरिक्त त्यांना दुसरे काही दिसत नाही.
सातारा विकास आघाडी वर आम्ही विरोधक म्हणून टीका करायची गरजच नाही जे काही चाललंय ते त्यांचेच सत्ताधारी पार्टीचे नगरसेवक सांगत आहेत त्यांचे हे अपयश हे डोळ्यात भरण्यासारखे आहे त्यांनी जर पुलाचे रुंदीकरण केले तर त्याच्यात एवढी फुशारकी मारण्यासारखे काय आहे विकास कामांची गती आणि काम पूर्ण करून घेण्याची पद्धती याचा आणि सातारा विकास आघाडीचा अजिबात संबंध नाही अशी टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.