
स्थैर्य, सातारा, दि.25 ऑक्टोबर : साताऱ्यात मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात दि. १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. सार्वजनिक मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष असलेले हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण, नाविन्यपूर्ण व्हावे यासाठी संयोजन समिती प्रयत्नशील आहे. या संमेलनात गझल कट्टयाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यासपीठावर स्वरचित गझल पाठवण्याचे आवाहन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, गझलकट्टा प्रमुख विश्वास कुलकर्णी, मुख्य समन्वयक हेरंब जोशी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
पत्रकात, साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या नियोजनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून नियोजनाचे काम वेगाने सुरु आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात गझल कट्टा या व्यासपीठावर गझल सादर करण्याची संधी मिळते. या गझल कट्टयासाठी गझल पाठवण्याचे आवाहन कविकट्टा संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी गझल ही स्वरचितच असावी. प्रत्येकाने एकच गझल पाठवावी. गझल टेक्स्ट स्वरुपात (युनिकोड) देवनागरीत टाईप केलेली असावी. गझलेत कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त सात शेर असावेत. निवड समितीची निर्णय अंतिम राहील व निवड झालेल्या गझलकारांना सादरीकरणाची वेळ आणि दिनांक दूरध्वनीव्दारे/ मेलव्दारे कळवण्यात येईल. गझलेशिवाय इतर कोणतीही अनावश्यक सजावट (स्माईली किंवा चिन्हे) टाकू नयेत. गुगल फॉर्ममध्ये नाव, संपूर्ण पत्ता, ई-मेल आयडी, व्हाटसअप असलेला मोबाईल नंबर ही माहिती लिहावी. कविकट्टा किंवा गझल कट्टा दोन्हीपैकी एकच पर्याय निवडून इच्चुकाने प्रवेशिका भरावी. काही अपरिहार्य कारणामुळे गुगल फॉर्म भरणे शक्य झाले नाही तरच मेलवर गझल पाठवावी. वरील नियमांचे पालन न केल्यास संबंधितांने पाठवलेली गझल ग्राहय धरली जाणार नाही. गझल तहतमध्येच (वाचून)सादर करावयाची आहे. तरतन्नुमध्ये (गाऊन) सादर करता येणार नाही. सादरीकरणानंतर गझलकरांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. गझल स्वीकारण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२५ आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या गझल स्वीकारल्या जाणार नाहीत. गझल पाठविण्यासाठी ई-मेल gazalkatta99satara@gmail.com तर गुगल फॉर्मची https://forms.gle/ewjzHGGq2PWf3DXPA ही लिंक असल्याची माहिती गझल कट्टा समन्वय समितीतर्फे देण्यात आली.

