साहित्यिक रिसर्च (शोध) हे समाज उपयोगी असावेत – प्रोफेसर डॉ. अर्जुन चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जून २०२२ । फलटण । आज साहित्य क्षेत्रात होणाऱ्या रिसर्च ची समाज उपयोगिता आणि त्याचा स्तर याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशावेळी साहित्यिक शोध करणाऱ्यांनी या क्षेत्राकडे अधिक गांभीर्याने पाहिले पाहिजे. केवळ नोकरी किंवा पदवी मिळवण्यासाठी साहित्यिक रिसर्च न करता, तो समाजाच्या उपयोगी पडण्याकरिता किंवा राष्ट्रीय योगदानासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी प्रोफेसर व अध्यक्ष डॉ. अर्जुन चव्हाण यांनी केले.

मुधोजी महाविद्यालय फलटण हिंदी विभाग व शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय हिंदी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. ‘साहित्यिक अनुसंधान के आधुनातन आयाम’ या विषयावर आयोजित या राष्ट्रीय वेबिनार चे उद्घाटक व बीज वक्ता म्हणून ज्येष्ठ हिंदी साहित्यिक, समीक्षक व अनुवादक प्रोफेसर डॉ. अर्जुन चव्हाण उपस्थित होते. मुख्य वक्ता म्हणून हिंदी साहित्यिक व समीक्षक प्रोफेसर डॉ. संदीप अवस्थी, अजमेर (राजस्थान) व अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र शहा हे उपस्थित होते.

आपल्या बीज भाषणात डॉ. अर्जुन चव्हाण पुढे असेही म्हणाले की शोध हा शोधा साठी झाला पाहिजे. विकासाभिमुख शोधाची आज खरी गरज आहे. यासाठी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांनी आत्म मूल्यांकन करून आपले शोध कार्य केले पाहिजे. शोध मार्गदर्शकाचे काम हे फार जबाबदारीचे आहे. त्या दृष्टीने त्यांनी स्वतःला या क्षेत्रात अगोदर सिद्ध केले पाहिजे. आजही साहित्यिक रिसर्च मध्ये काही विषय हे उपेक्षित राहिले आहेत. ते विषय घेऊन शोध होणे अपेक्षित आहे. गीत, गजल, व्यंग्य रचना, साक्षात्कार, यात्रा वर्णन, पत्रलेखन या विषयावर काम होणे गरजेचे आहे. तसेच इंटरनेट ची हिंदी, वेब साहित्य, ई-जर्नल्स, ट्विटर हे देखील आजच्या आधुनिक युगात रिसर्च चे विषय होऊ शकतात.

डॉ. संदीप अवस्थी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, साहित्यिक रिसर्चला जास्तीत जास्त समाज उपयोगी कसे बनविता येईल याकरिता प्रयत्न झाले पाहिजेत. आपल्याकडे भाषा व विषयाचे सखोल ज्ञान असेल तर आपण अधिक चांगल्या प्रकारे साहित्यिक शोध कार्य करू शकतो. तुमची पीएच.डी.ची पदवी केवळ नोकरीसाठी उपयोगी न ठरता भावी पिढीसाठी उपयोगी ठरली पाहिजे. समाजातील श्रमिक शेतकरी, शोषित, उपेक्षित वर्ग तसेच लोकसाहित्य व लोकसंस्कृती यांना केंद्रस्थानी ठेवून साहित्यिक रिसर्च होणे आवश्यक आहे. आज हिंदी भाषा ही केवळ साहित्याची भाषा राहिली नसून ती प्रयोजनमूलक हिंदी झाली आहे. त्यादृष्टीने पत्रकारिता, सिनेमा क्षेत्र, जाहिराती, पटकथा व संवाद लेखन, अनुवाद लेखन या विषयांवर रिसर्च च्या खूप संधी उपलब्ध आहेत. त्यादृष्टीने शोध मार्गदर्शक व शोधार्थी यांनी जरूर विचार करावा. दर्जेदार जर्नल्स साठी रिसर्च पेपर कसा लिहिला पाहिजे याचे देखील मार्गदर्शन डॉ. अवस्थी यांनी केले. हिंदी भाषेतील काही दर्जेदार जर्नलची नावे देखील त्यांनी उपस्थितांना सांगितली.

प्राचार्य डॉ. राजेंद्र शहा यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात वेबिनार चा विषय किती प्रासंगिक आहे, याविषयी आपले विचार मांडले. ते असेही म्हणाले की पीएच.डी. चा शोध प्रबंध लिहिणे हे काही लगेच होणारे काम नाही. त्यासाठी शोधार्थी ला खूप परिश्रम घ्यावे लागतात व वेळही द्यावा लागतो. असे परिश्रम घेण्याची तयारी असणाऱ्यांनीच या क्षेत्राकडे वळावे. शोध मार्गदर्शकांनी देखील योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्याच त्या विषयांवर रिसर्च न होता, आज समाजातील जे प्रश्न व समस्या घेऊन साहित्य लिहिले जात आहे त्या विषयांवर रिसर्च होणे गरजेचे आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी फलटण एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालया संबंधी माहिती देऊन वेबिनार मध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांचे तसेच प्राध्यापक व विद्यार्थी यांचे स्वागत केले. शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषदेचे सचिव डॉ. नाजिम शेख यांनी प्रास्ताविक केले. निमंत्रित मान्यवरांचा परिचय हिंदी विभाग प्रमुख डॉ. नितीन धवडे यांनी करून दिला. या राष्ट्रीय वेबिनार मध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील काही राज्यातील प्राध्यापक 75 पेक्षा जास्त संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार डॉ. सौ. सविता नाईक-निंबाळकर यांनी मानले. सूत्र-संचालन डॉ. सिराज शेख यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!