सारंगखेड्यातील प्रसिद्ध नृत्य करणारा घोडा ‘राजू 3’ सातार्‍यात दाखल

‘राजू 3’ ला पाहण्यासाठी जिल्ह्यातून नागरिकांची गर्दी


करंजे गावातून राजु 3 या घोड्याची काढलेली भव्य मिरवणूक. (अतुल देशपांडे, सातारा.) 

स्थैर्य, सातारा, दि. 24 डिसेंबर : सातारा शहरानजीकच्या करंजे गावातील गेली अनेक वर्षे फुलांचा व्यवसाय करणार्‍या नारायण उर्फ बाळू शेठ वाघ यांनी केवळ हौसेपोटी सारंगखेडा येथून हा राजू 3 नावाचा दोन वर्षाचा पांढरा शुभ्र देखणा घोडा सातारकरांच्या विविध शुभ कार्यामध्ये सहभाग व्हावा या इच्छेने आणि संकल्पाने आणलेला आहे.

बाळू वाघ यांनी फुलांचा व्यवसाय करत आपला छंद आणि आवड जोपासत प्रथम महाबळेश्वर येथून बैलजोडी आणली ,त्यानंतर ओगलेवाडीतून आबा नावाचा घोडा आपल्या दावणीला बांधला. चरेगाव येथील दोन घोडे आणून त्यांना एक आगळावेगळा छंद लागला तो म्हणजे घोडे खरेदीचा आणि या घोडे खरेदीतून त्यांनी जिल्ह्यातील विविध शुभकार्य, लग्न समारंभ, मिरवणुका, वराती यामध्ये हे घोडे सेवेसाठी सादर केले.

2017 मध्ये सारंगखेडा येथून प्रथम आणलेला घोडा ही दुसर्‍या क्रमांकाचे विजेता ठरलेला होता. संगमनेर येथून पुन्हा आणखीन एक घोडा आणून इंदापूर येथे त्याने पारितोषिक मिळवले. आपल्या पत्नी सौ.लक्ष्मी यांच्या सहकार्याने धंद्यात यश तर मिळालेच आणि भरभराट होत गेली. दोन घोड्यांची एकसारखी जोडी असावी यासाठी हा सारंगखेडा येथील अनमोल किमतीचा सुरेख देखणा राजू तीन नावाचा घोडा इमरान शेख या घोडेमालकाकडून आणला असून या घोड्याची भव्य मिरवणूक करंजे परिसरात काढण्यात आली होती .

सध्या बाळू वाघ यांच्याकडे सोन्या नावाचा आणखीन एक घोडा असून त्यानेही अनेक कार्यक्रमात रोख रकमेची बक्षिसे पटकावलेली आहेत. राजू तीन हा नाचरा आणि अतिशय देखणा घोडा मिरवणुकीमध्ये सादर करताना उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधले या मिरवणुकीमध्ये परात, चौरंगी पाट यावर दोन पायांचा सुरेख नृत्य हलगी, पिपाणीच्या नादावर सादर करीत या राजू तीन घोड्याने सर्वांचे लक्ष वेधले .दोन पायावर अतिशय उंच अशी अभिवादनाची पोज घेत राजूने केलेले नृत्य हे सर्वांनाच टाळ्यांच्या गजरात दाद देणारे ठरत होते.

वाघ परिवाराने या अनोख्या सातारकरांच्या सेवेसाठी आणलेल्या राजु 3ची संपूर्ण जबाबदारी बाळू शेठ वाघ यांचे चिरंजीव गणेश हे पाहत असून अतिशय आनंदाने या घोड्यांचे ते पालन पोषण करत आहेत व यापुढे करणार आहेत. गेली दीड वर्षे हा घोडा आपल्या तबेल्यात असावा अशी मागणी ते शेख यांच्याकडे करत होते, या घोड्याची किंमत करणे ही अवघड असताना दिलेल्या मोबदल्यात हा घोडा सातारकरांसाठी शेख यांनी वाघ परिवाराकडे दिलेला आहे अशी माहिती यावेळी गणेश वाघ यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!