सामाजिक न्याय विभागाच्या शाळा झाल्या डिजीटल डिजीटल क्लासरूम राज्यातला पहिलाच प्रयोग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । सोलापूर । पूर्वीच्या काळी शाळेमध्ये भिंतीवर काळा फळा लटकावलेला असायचा. गुरूजी/सर/मॅडम फळ्यावर खडूने लिहून गणित समजावून द्यायचे. इंग्रजीचे स्पेलिंग, विज्ञानाच्या व्याख्या, मराठी व्याकरण, भूमितीचे प्रमेय हे आपण फळ्यावरच शिकत आलो. कधी स्पष्ट दिसत नव्हते तर फळा पुसताना पूर्ण पांढरा होत असे. यामुळे मुलांना काय लिहिले आहे हे कळत नव्हते. मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शाळांमध्येही बदल होऊ लागले आहेत. सोलापूरच्या समाज कल्याण कार्यालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी दोन शाळा आता डिजीटल क्लासरूम झाल्या आहेत. समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळेचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, नजिक पिंपरी (ता. मोहोळ) आणि अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, अक्कलकोट या दोन्ही शाळेमध्ये डिजीटल क्लासरूम सुरू करण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजना सन 2020-21 मध्ये वैशिष्टयपूर्ण/नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत डिजीटल क्लासरूम प्रकल्प राबविण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झालेला असून डिजीटल पध्दतीचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या टॅबचा वापर करून उपक्रम तयार केले आहेत. या प्रकल्पामुळे शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ झालेली असून विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे.

डिजीटलबरोबर वायफाय सुद्धा

जिल्ह्यातील अकरा तालुक्यात सामाजिक न्याय विभागाची 9 वसतिगृहे, दोन निवासी शाळेत डिजीटलबरोबर वायफाय सुद्धा देण्यात आले आहे. जिल्ह्यातील नेहरूनगर येथील दोन वसतिगृहे, बार्शी येथील मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, माढा, कुर्डुवाडी, करमाळा, अक्कलकोट येथील मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, अक्कलकोट आणि नजिक पिंपरी (ता. मोहोळ) येथील निवासी शाळा याठिकाणी वायफाय सुविधा दिली आहे. सात रस्ता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातील सामाजिक न्याय विभागाचे संपूर्ण कार्यालय वायफाय करण्यात आले. महाराष्ट्रातला हा पहिला पायलेट प्रोजेक्ट ठरणार आहे. वायफायमुळे गोरगरीब मुलांचा नेटवरील खर्च वाचला आहे.

गणिताच्या अवघड संकल्पना सोप्या वाटू लागल्या-गौरव गौडदाब, विद्यार्थी

गौरव राजू गौडदाब हा इयत्ता 10 वीमध्ये शिकत आहे. त्याने 8 वीमध्ये असताना अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, नजिक पिंपरी, ता.मोहोळ येथे प्रवेश घेतला. मुलांना ग्रीन बोर्डवर शिकवले जात होते. काही काळानंतर कोरोनामुळे शाळा बंद झाली. पुन्हा हा विद्यार्थी 10 वीत गेल्यावर शाळा चालू झाली. सध्या या शाळेत डिजीटल क्लासरूममध्ये नवीन पध्दतीने डिजीटल बोर्डवर शिक्षण दिले जात आहे. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला टॅबचा वापर करून शिकविले जाते. टॅबच्या सहाय्याने विज्ञान व गणित शिकवल्यामुळे त्यातील अवघड संकल्पना सहज आणि लवकर समजतात. हे विषय समजण्यास खूप सोपे झाले आहेत. पूर्वी ग्रीन बोर्डवर शिकवल्यामुळे ऐकून व पाहून शिक्षण घ्यावे लागत असल्याने गणित, विज्ञान विषय अवघड वाटायचे. आता शिकविताना वापरल्या जाणाऱ्या डिजीटल पध्दतीमुळे कितीही अवघड संकल्पना समजून घेणे खूप सोपे झाल्याचे गौरव गौडदाब याने सांगितले.

टॅब वापराने आत्मविश्वास वाढला-करण गटकांबळे, विद्यार्थी

करण गटकांबळे हा अक्कलकोट येथे इयत्ता 6 वीमध्ये शिकत आहे. शाळेमध्ये डिजीटल क्लासरूममध्ये डिजीटल पध्दतीचा वापर करून शिकवितात. शिक्षक वाचून व फळ्यावर लिहून न दाखवता धड्याचा (पाठ) व्हिडीओ दाखवून शिकवितात. त्यामुळे तो धडा चांगला समजतो. प्रवेश घेण्यापूर्वी मी शिकत असलेल्या शाळेमध्ये फळा व खडूचा वापर करून शिकवायचे. त्यामध्ये शिक्षक फळ्यावर लिहिलेले पुसायचे, त्यामुळे काही गोष्टी लिहून घ्यायच्या आणि समजायच्या राहून जायच्या. आता डिजीटल बोर्डमुळे माझी अडचण दूर झाली आहे. शाळेने मला टॅब वापरण्यास दिलेला आहे. मला हवी असलेली शैक्षणिक माहिती मी गुगलवर सर्च करू शकतो. मी स्वत: टॅब वापरत असून माझा आत्मविश्वास वाढला असल्याचे करण गटकांबळे याने सांगितले.

अभ्यासाला येणार गती- कैलास आढे, सहायक आयुक्त समाज कल्याण

कोरोनात ऑनलाईन शिक्षणामुळे अँड्रॉइड मोबाईल व इतर नेट पॅकवर मोठा खर्च होतो. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा खर्च परवडणारा नाही. वसतिगृहात असणारी मुले ही गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील असतात. या वाय-फाय सुविधेमुळे त्यांच्या अभ्यासाला गती मिळणार आहे. निवासी शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजीटल पध्दतीने शिक्षण देण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थी तंत्रस्नेही होत असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होत आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धेमध्ये टिकून राहण्यास अत्यंत उपयोगी ठरणार आहे.

-धोंडिराम अर्जुन, माहिती सहायक,

जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर.


Back to top button
Don`t copy text!