
दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२२ । सातारा । छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण केले. अशा या पराक्रमी राजाचा राज्याभिषेक सोहळा जिल्ह्यासह सातारा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन होय. या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोनामुळे सलग दोन वर्षे हा सोहळा धामधुमीत साजरा करता आला नव्हता. यंदा कोरोनाची लाट ओसरल्याने जिल्ह्यासह सातारा शहरात हा दिवस जल्लोषात साजरा झाला.
सोमवारी सकाळपासूनच पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची रेलचेल सुरू होती. दुपारी साडेतीन वाजता जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी एकत्र येत पोवई नाका ते राजवाडा अशी भव्य रॅली काढली. या रॅलीतील चित्ररथांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी अवघी शाहूनगरी दुमदुमून गेली.
शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून साताºयातील तख्ताचा वाडा, गुरुवार बाग येथ पंचधातूपासून तयार करण्यात आलेल्यो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाताच्या पंजाच्या प्रतिकृतीला अभिषेक घालण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि शिवराज्यभिषेक दिन उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कॉगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समितीचे अध्यक्ष कॉगेसचे प्रदेश वक्ते अरबाज शेख यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सोहळ्यासाठी माजी नगरसेविका सुजाता राजे महाडिक, हरजीराजे महाडिक यांचे वंशज सागरराजे महाडिक, यशवंतराव राजे घोरपडे, धनश्री महाडिक, सुषमा राजे घोरपडे प्राची ताकतोडे, प्रकाश मोरे, रफिक शेख, सचिन पवार, अमोल खंडाळकर, रमिज शेख, हरी ओम ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.