दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२२ । सातारा । सातारा पालिका व प्रदूषण नियंत्रण महामंडळाने मंगळवारपासून सिंगल यूज प्लास्टिकचा साठा व विक्री करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांवर कारवाई करून प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसूल केला.तसेच दोन टन प्लास्टीक जप्त करण्यात आले.
पथकाने मोती चौक ते पोवई नाका या मार्गावरील मोमीन ट्रेडर्स, दत्ताछाया भंडार, कच्छी ट्रेडर्स, दोशी ट्रेडर्स, शक्ती ग्लास, नमित ट्रेडर्स अशा सहा दुकानांवर धाड टाकली. यावेळी सर्वच दुकानांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक, बंदी असलेल्या पिशव्या व इतर वस्तूंचा साठा आढळून आला. कारवाईत प्लास्टिक पिशव्या, डबे, स्ट्रॉ, थर्माकोल तसेच १०० मायक्रोन पेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर्स आदी दोन टन साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी पाच असा एकूण तीस हजारांचा दंड वसूल करण्यात आल्या.
या कारवाईत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकारी रेखा तोगरे, अर्चना जगदाळे, शंकर कुंदळे, उपप्रादेशिक अधिकारी लिंंबाजी भड, पालिकेचे आरोग्य निरीक्षक सागर बडेकर, प्रकाश राठोड आदींनी कारवाईत सहभाग घेतला.