
स्थैर्य, सातारा, दि. 18 डिसेंबर : कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅन्ड रिसर्च येथे रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीची स्थापना करण्यात आली असून त्याचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. इन्स्टिट्यूटमधील बीबीए, बीसीए व एमबीए कोर्सच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामार्फत केंद्रींय व राज्य पातळीवर उपलब्ध असलेल्या शासकीय नोकरीच्या संधी व त्यासाठी करावयाच्या तयारीसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने रयत स्पर्धापरीक्षा अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक लोकसत्ता चे व्यवस्थापक संदीप गिरीगोसावी होते ज्ञात व अज्ञात माहितीचे संकलन व अवलोकन करणे म्हणजेच स्पर्धा परिक्षेची तयारी असे उद्गाार त्यांनी काढले. प्रत्येक विद्यार्थ्याने दैनिक वर्तमानपत्र व त्यातील अग्रलेख वाचून त्याच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतंत्र दैनिक नोंदवही ठेवणे उपयुक्त आहे.असे ते म्हणाले
श्री. अभिषेक गोरे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, योग्य अभ्यासपद्धती, वेळेचे नियोजन व आत्मविश्वासाने सामोरे जाणे गरजेचे यावर सखोल मार्गदर्शन केले.
शिवाजी कॉलेज स्पर्धा परिक्षा केंद्राचे संचालक डॉ. शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्यासाठी सातत्य पुर्ण वाचन व चिंतन गरजेचे असल्याचे सांगितले.
डॉ. बी. एस. सावंत यांनी स्पर्धा परीक्षांचे वाढते महत्त्व स्पष्ट केले. रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या यशाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल अशी भावना व्यक्त केली. मॅनेजमेंट व संगणक पदवीधारक विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेत असतानाच द्वितीय वर्षापासूनच स्पर्धा परिक्षेचे फॉर्म भरा व वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षा द्या त्यासाठी आवश्यक त्या सुविधा स्वतंत्र अभ्यासिका, ग्रंथालय व मार्गदर्शन वर्ग मोफत या अकॅडमी मध्ये उपलब्ध आहेत याचा फायदा सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना अकॅडमीचे समन्वयक डॉ संतोष चव्हाण यांनी केली व सूत्रसंचालन कु. अमृता पंडित यांनी केले. आभार प्रदर्शन एमबीए भाग दोन ची विद्यार्थिनी कु. रुपाली कदम हिने केले. तिने सर्व मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

