
दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२५ | सातारा |
सातार्याजवळ ‘हनी ट्रॅप’चे प्रकरण उघड झाले असून यात सेंट्रिंग कामे करणार्याचे अपहरण करून त्याच्याकडून ३ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली आहे. व्हॉटस्अॅपवर महिलेची ओळख झाल्यानंतर ती ओळख वाढवून संमतीने शरीरसंबंध केल्यानंतर महिलेसह चौघांच्या टोळीने सेंट्रिंग काम करणार्याचे अपहरण केले. यानंतर बेदम मारहाण करत ३ लाख रुपयांची खंडणी उकळली. या प्रकरणाची सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
सातार्यात १० फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. तक्रारदार पुरुष सातार्यात सेंट्रिंगची कामे घेतो. तो अनोळखी महिलेच्या व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून संपर्कात आला. महिलेची ओळख वाढवल्यानंतर सेंट्रिंगचे काम देतो, असे महिलेला सांगितले. यासाठी पेट्री गावच्या हद्दीत काम असल्याचे सांगून ते दाखवण्यास नेले. साईटचे काम पाहून झाल्यानंतर कासला जाऊ, असे ठरल्यानंतर एकीव फाट्यानजीक लॉजमध्ये दोघेही गेले. तेथे दोघांच्या संमतीने शरीरसंबंध झाले. तेथून दोघेही पुन्हा कारने पेट्री फाट्यानजीक आल्यानंतर महिलेने तिच्या चार साथीदारांना बोलावून घेतले. संशयित चौघेजण कारजवळ आल्यानंतर त्यांनी तक्रारदाराचे अपहरण केले. कारमध्ये मारहाण करत तेथून वेचले, ता. सातारा गावच्या हद्दीत एका खोलीत डांबून ठेवले. या ठिकाणी पुन्हा मारहाण करत ‘आमच्या बहिणीला लॉजवर घेवून जाण्याची तुझी हिम्मत कशी झाली, तुला जिवंत ठेवत नाही, तू आम्हाला पैसे दे, नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो,’ असे म्हणत ब्लॅकमेल केले. १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्यानंतर तक्रारदार याने पत्नीला फोन करून ३ लाख रुपये मागवून घेतले. संशयितांनी ते पैसे घेतले. तसेच आणखी २ लाख रुपये दिले नाही तर रेपच्या केसमध्ये अडकवीन. तसेच व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली. तक्रारदाराने सुटल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर महिलेसह अनोळखी चौघांच्या टोळीवर अपहरण, मारहाण, खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.