दैनिक स्थैर्य । दि. ०६ जून २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील मसूर येथील एका बंगल्यावर २ मार्च रोजी दरोडा पडला होता. या घटनेत दरोटा टाकणाऱ्या बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील टोळीविरोधात साताऱ्याचे पोलीस अधीक्षकांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीवर सातारा जिल्ह्यातील वडूज, औंध, उंब्रज तसेच पुणे, बीड, अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
टोळीप्रमुख होमराज उर्फ होम्या उद्धव काळे, (वय ४०), सुनिता होमराज काळे, कानिफनाथ उद्धव काळे (तिघे. रा. वाकी शिवार, ता. आष्टी, जि. बीड), अजय उर्फ आज्या सुभाष भोसले (२३), सचिन उर्फ आसी सुभाष भोसले (२४), रुस्तुमबाई सुभाष भोसले (५५), अविनाश उर्फ आवी उर्फ महिंद्रा सुभाष भोसले (२२, चौघे रा. माहिजळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर), राहुल उर्फ काळ्या पदु भोसले (२८, रा. वाळुज पारगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), अतुल लायलन भोसले (रा. आष्टी, जि. बीड), धल्ल्या उर्फ धमेंद्र ननश्या काळे (रा. चिखली, ता. आष्टी), गणेश उर्फ बन्सी रंगिशा काळे (रा. राशिन ता. कर्जत), संतोष विनायक पंडित (रा. तेलीगल्ली, आरणगाव जि. अहमदनगर हल्ली रा. माहिजळगाव), निलेश संतोष पंडित, सुवर्णकार (रा. तेल्लीगल्ली आरणगाव, जि. अहमदनगर. हल्ली रा. माहिजळगाव, ता. कर्जत) यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
याबाबत माहिती अशी की, औंध, उंब्रज, वडूज हद्दीत मध्यरात्री कडी कटावणीने उचकटून घरातील व्यक्तिंना शस्त्रांनी मारहाण करणे, दहशत निर्माण करुन, जीवे मारण्याची धमकी देऊन दुखापत करुन त्यांच्याकडील सोन्याचांदीचे दागिने, रोकड असा ऐवज चोरून नेण्याच्या घटना वर्षभरात वाढल्या होत्या. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी अशा गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार कारवाईच्या सूचना केल्या होत्या.
दरम्यान, उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील मसूर येथे २ मार्च रोजी मध्यरात्री एका बंगल्याची कडी उचकटून बंगल्यात राहणाऱ्या व्यक्तींना शस्त्रांने मारहाण केली होती. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा ५ लाख, ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्हाचा तपास करुन बीड, अहमदनगर जिल्ह्यातील तेराजणांवर कारवाई केली.
त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण १९९९ अन्वये कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली. या गुन्ह्याचा तपास कऱ्हाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील तपास करत आहेत.