सातारा ग्रंथ दालनातील 242 गाळ्यांची सोडत

प्रा. मिलिंद जोशी ; ग्रंथप्रदर्शने संमेलनाचे खरे वैभव


सातारा : अखिल भारतीय मराठी संमेलनात असलेल्या ग्रंथ दालनातील 242 गाळ्यांची सोडत काढताना उपस्थित (डावीकडून) संपदा घाटगे, ऋषिकेश सारडा, कैलास अतकरे, प्रा. मिलिंद जोशी, प्रतिभा विश्वास आणि सुनिताराजे पवार.

स्थैर्य, पुणे, दि. 27 डिसेंबर : लेखक, साहित्यिक, वाचक व प्रकाशक यांचे साहित्य संमेलनांमधील स्थान मोलाचे आहे. वेगवेगळ्या प्रवाहातील साहित्यकृती प्रकाशकांनी समाजासमोर आणल्यामुळे वाचकवर्ग निर्माण होतो. प्रकाशक वगळून साहित्यप्रवाह कधीच निर्माण होऊ शकणार नाहीत. ग्रंथप्रदर्शने संमेलनाचे खरे वैभव आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे होत असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ दालनातील 242 गाळ्यांची सोडत आज (दि. 27) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात प्रा. मिलिंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. साहित्य महामंडळाच्या कार्यावाह, ग्रंथ दालन समितीच्या प्रमुख सुनिताराजे पवार, संयोजक संस्थेचे ऋषिकेश सारडा, अहिल्यानगरचे कैलास अतकरे, मुंबई साहित्य संघाच्या प्रतिभा विश्वास, सातारा येथील संमेलन संयोजन समितीच्या प्रतिनिधी संपदा घाटगे यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौउंडेशनतर्फे दि. 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत शाहू स्टेडियम येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

जागतिकीकरणाच्या रेट्यात ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदावत व विस्तारित गेल्यामुळे साहित्य संमेलने अधिक प्रमाणात पुस्तककेंद्रीत करण्याचा मानस आहे. प्रकाशकांना वगळून साहित्य प्रवाह कधीच सशक्त होऊ शकत नाही, असे सांगून प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, साचा मोडल्याशिवाय नवनिर्मिती होत नाही. संमेलनादरम्यान प्रकाशक, वितरक यांची अव्यवस्था होऊ नये याकरिता अनेक महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. संमेलनाच्या मुख्य मंडपात प्रवेश करण्याकरिता प्रत्येकाला ग्रंथ दालनातूनच जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे दालनातील प्रकाशक, वितरक, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र भोजनासह अत्यावश्यक बाबींची सोय करण्यात आली आहे. संमेलन यशस्वी होण्याकरिता महामंडळाचे अधिकारी, प्रतिनिधी आणि प्रकाशक-वितरक यांच्यातील संवादाचे पूल कायम खुले राहणार आहेत. यंदाच्या उपाययोजना भविष्यातील संमेलनांसाठी उपयुक्त ठरतील. काही त्रुटी राहिल्यास त्याही दूर करणे शक्य होईल.

सुनिताराजे पवार म्हणाल्या, सातारा जिल्ह्यात अजूनही वाचन संस्कृती मोठ्या प्रमाणात टिकून आहे. प्रकाशक, वितरक लेखक आणि वाचक यांनी मायमराठीसाठी उत्तम दर्जाचे काम होण्याकरिता एकत्र येणे आवश्यक आहे. इंग्रजीच्या रेट्यात मराठी वाचनसंस्कृती वाढीस लागावी याकरिता महामंडळाबरोबर प्रकाशक आणि वितरकांची संवादी भूमिका असणे आवश्यक आहे.

 


Back to top button
Don`t copy text!