दैनिक स्थैर्य । दि. ०५ मार्च २०२२ । मुंबई । सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यकारी व्यवस्थापन व देखभाल यंत्रणा समाधानकारक नसल्याने श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाने दिले आहेत. पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याने स्थानिक पातळीवर प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत पाहणी करण्यात आली. यानंतर सुनावणी घेण्यात येऊन त्रुटी आढळल्यानुसार हे आदेश बजावण्यात आले आहेत.
पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत येत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी पाण्याची स्वच्छता करून गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजनांवर त्यांनी चर्चा केली. नदीत मृत झालेल्या माशांची संख्या, कचऱ्याचे प्रमाण, पाण्यात येणारा फेस यासारख्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी संबंधित घटकांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे यांनी दिले होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाने नदी प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेऊन दि. 1 मार्च 2022 रोजी पाहणी केली. त्यानंतर मे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि. कसबा बावडा यांची वैयक्तिक सुनावणी घेण्यात आली. या पाहणीमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये आठ इंची पाईप लाईनद्वारे नदीचे पाणी येत असल्याचे व ते पाणी प्रक्रिया पूर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीमध्ये सौम्यकरण करण्यासाठी वापरताना आढळले. क्लॅरिफायर (२) मध्ये सौम्यीकरण (Dilution) करताना आढळले. ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टममध्ये प्रक्रिया पूर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीमधील पाणी घालून परिणाम बघितले असता केमिकल ऑक्सिजन डिमांड व बायलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (COD-७६९, BOD-३८६) आढळून आले. वायुवीजन (Aeration) टाकीमधील एमएलएसएस 1200 ते 1400 इतके कमी आढळून आले. यामुळे कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश बजावण्यात आल्याचे या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
तत्पुर्वी दि. 19 जानेवारी 2022 च्या मासे मृत झाल्याच्या अनुषंगाने दि. 25 जानेवारी 2022 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा अभियंता (Hydrolic Engineer) व पर्यावरण अभियंता यांना दुधाळी नाला, जामदार नाला , सी. पी. आर. नाला, कसबा बावडा (स्मशानभूमी) नाला (राजाराम बंधारा), मे. कोल्हापूर शुगर मिल (आसवणी प्रकल्प) लगून च्या खालच्या बाजूस असलेल्या नाल्यातील सांडपाणी प्रक्रियेकरिता घरगुती सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये घेतले जात नसून पंचगंगा नदीमध्ये मिसळले जात असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर दि. 19 जानेवारी 2022 च्या मासे मृत झाल्याच्या अनुषंगाने दि. 25 जानेवारी 2022 रोजी मे. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना यांना प्रक्रिया केलेले पाणी (शेतासाठी) नागांव येथे (11 कि.मी.) वाहवून नेणारी पाईप लाईन गळती संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली होती.