दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२२ । फलटण । माजी खासदार, जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरीचे संस्थापक चेअरमन, सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांनी फलटण एज्युकेशन सोसायटी या येथील नामांकित शिक्षण संस्थेस १०१००० रुपये रोख (एक लाख एक हजार) रोख रक्कम देणगी स्वरुपात आज संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केली आहे.
जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी सदर रक्कम फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचेकडे सुपूर्त केली, त्यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डाॅ. बाळासाहेब शेंडे, संचालक महादेव माने, जवाहर कारखान्याचे संचालक आण्णासाहेब गोटखिंडे व सुरज बेडगे, प्रोजेक्ट मॅनेजर मानसिंग पाटील, श्रीराम जवाहरचे सर्व अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार हेमंत रानडे, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम उपस्थित होते.
सुमारे १५ दिवसांपूर्वी सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना श्रीमंत मालोजीराजे स्मृती महोत्सवा दरम्यान, मुधोजी हायस्कूल येथील समारंभात श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूलची संस्थान कालीन जुनी देखणी वास्तू, त्याची दुरुस्ती देखभाल आणि संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेली कृषी, उद्यानविद्या, अभियांत्रिकी, नर्सिंग आणि आर्ट्स, सायन्स, कॉमर्स महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये, इंग्रजी माध्यमाची प्राथमिक व माध्यमिक विद्यालये या बाबत माहिती घेतली होती. ते स्वतः इचलकरंजी येथे एक शिक्षण संस्था उत्तम पद्धतीने चालवीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते, त्या पार्श्वभूमीवर आदरणीय दादांची ही देणगी म्हणजे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या पाठीवर शाब्बासकीची थाप म्हणावी लागेल.