
स्थैर्य, सातारा, दि. 20 ऑगस्ट : कोल्हापूर सर्किट बेंचच्या इमारत निर्मितीत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे काम गिनिज बुकमध्ये नोंद करण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काढले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे रविवारी (ता. 17) सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवेंद्रसिंहराजेंच्या कामगिरीचे कौतुक केले.
कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटन सोहळ्यात विविध मान्यवरांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. सरन्यायाधीश गवई म्हणाले, महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधकाम विभाग व अतुल चव्हाण यांच्या संपूर्ण टीमने जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवले आहे. मीतर म्हणतो गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करावी, अशीही बाब आहे. 20 ते 25 दिवसांच्या कालखंडात संपूर्ण इमारतीचे रुपडे बदलून सर्वोच्च न्यायालयाला साजेशी अशी सुंदर इमारत निर्माण केली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आभार मानतो.’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या कामगिरीची दखल घेतली. फडणवीस म्हणाले, मी विशेष अभिनंदन करेन, आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे. त्यांनी केलेले काम उठावदार आहे. त्याबरोबरच मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचेही अभिनंदन करतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हेरिटेजसारखा लुक ठेवून कोल्हापूर सर्किट बेंचच्या इमारतीचे काम अतिशय उत्तम झाले आहे. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शाबासकीमुळे आणि केलेल्या गौरवामुळे अधिक जोमाने आणि जिद्दीने अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. यापुढेही जनतेच्या हिताचे काम प्रामाणिकपणे केले जाईल.
शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक बांधकाममंत्री)