
फलटणमधील पत्रकार परिषदेत अक्षय तावरे, मंगेश खंदारे यांची टीका; आंदोलनाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह
स्थैर्य, फलटण, दि. २४ सप्टेंबर : “रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी फलटणमध्ये घेतलेला मोर्चा हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नसून, तो कसायांच्या समर्थनार्थ होता,” असा थेट आरोप फलटणमधील गोरक्षक अक्षय तावरे आणि मंगेश खंदारे यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. या मोर्चात दूध उत्पादक शेतकरी दिसत नव्हते, तर गोहत्या बंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असलेले आणि तडीपार झालेले कसाईच मोठ्या संख्येने उपस्थित होते, असा दावाही त्यांनी केला.
काल झालेल्या मोर्चावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तावरे आणि खंदारे बोलत होते. ते म्हणाले, “फलटण तालुक्यात गोहत्येचे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाखाली कसायांच्या बेड्या तोडण्यासाठीच हा मोर्चा फलटणमध्ये घेण्यात आला का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सदाभाऊ खोत हे विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यांनी हा विषय रस्त्यावर न मांडता विधान परिषदेत मांडावा, असेही ते म्हणाले.
मोर्चामध्ये सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर खोत यांनी गोरक्षकांना दांडक्याने मारण्याची भाषा वापरली, याचाही गोरक्षकांनी तीव्र निषेध केला. “आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करतो, मात्र आमच्यावर कोणी हल्ला केल्यास त्याला कायद्याच्या दांडक्यानेच उत्तर दिले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
गोरक्षक गोशाळा चालवत नाहीत, या टीकेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, फलटणमधील गोरक्षक सौरभ सोनवले हे स्वतःच्या खर्चाने ११ भाकड देशी गोवंशाचा सांभाळ करत आहेत. गोहत्या बंदी कायद्याला ‘कॅन्सर’ म्हणण्यावर आक्षेप घेत ते म्हणाले, “खरा कॅन्सर हा दुभत्या जनावरांची कत्तल करणारे कसाई आणि दुधातील भेसळ हे आहेत. गोहत्या बंदीमुळे दुभती जनावरे वाचत आहेत.”
या मोर्चामागे मतांचे ध्रुवीकरण करण्याचे आणि मुस्लिम समाजाची मतपेढी मिळवण्याचे राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला. या पत्रकार परिषदेमुळे फलटणमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.