
सातारा – येथील पोवई नाका परिसरात श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे पंचारतींनी औक्षण करताना सुवासिनी. (छाया : अतुल देशपांडे)
स्थैर्य, 23 जानेवारी, सातारा : राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींचा पादुका दौरा श्री समर्थ सेवा मंडळाचेवतीने यावर्षी सोलापूर, लातूर, हैदराबाद, सांगली येथे यशस्वीपणे गेली दोन महिने पूर्ण करण्यात आला. त्यानंतर या पादुका चाफळ मार्गे समर्थ भक्तांसोबत शुक्रवार दि. 23 रोजी पादुका सायंकाळी पाच वाजता सातारा येथे आणण्यात आल्या. पोवईनाका येथे शिवतीर्थावर मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी समर्थ पादुकांचे स्वागत सुवासिनींनी पंचारतींनी केले. नूतन उपनगराध्यक्ष अॅडव्होकेट दत्तात्रय बनकर, ज्येष्ठ नगरसेवक अविनाश कदम यांच्याहस्ते पादुकांचे स्वागत करण्यात आले. श्री समर्थ सेवा मंडळाच्यावतीने योगेश बुवा रामदासी यांनी या दोघांचा सत्कार केला.
पादुकांचे स्वागतासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवसमर्थ भक्त व वारकरी संप्रदायांच्या शेकडो वारकरी मंडळींच्यावतीने या या समर्थ पादुकांचे पूजन करण्यात आले. पोवई नाक्यावर महिलांनी पुष्पवृष्टी करून समर्थांच्या पादुकांचे स्वागत केले. पंचारतींनी औक्षण करताना ‘समर्थ रामदास स्वामी महाराज की जय’, ‘जय श्रीराम’, ‘आर्यसनातन हिंदू धर्म की जय’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
फुलांनी व विद्युत रोषणाईने सुशोभित केलेल्या श्रीराम व सीतेच्या मूर्ती पुढे या समर्थांच्या दोन पादुका समर्थभक्त योगेशबुवा रामदासी व ज्येष्ठ समर्थ भक्त विद्याधरबुवा वैशंपायन यांनी ठेवल्यानंतर या मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणूक मार्गावर काढण्यात आलेल्या भव्य रांगोळ्या लक्षवेधक ठरत होत्या. स्वागतानंतर निघालेल्या मिरवणुकीत आंबेघर -मेढा येथील बाल वारकर्यांचे वारकरी संप्रदायाचे चक्रीभजन विशेष लक्ष वेधणारे होते. वारकरी दिंडी सोबत ही मिरवणूक पोवई नाका येथून सुरू होऊन मल्हार पेठ ,शेटे चौक, कमानी हौद,देवी चौक मार्गे मोती चौकात येऊन त्यानंतर समर्थ सदन,र ाजवाडा येथे आल्यावर पादुकाचे यथोचित स्वागत आणि पूजन करण्यात आले.
समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अच्युतराव गोडबोले, कार्यवाह समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी, समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी गुरुजी, राजू उर्फ मुरलीधर कुलकर्णी, अशोक गोडबोले, कल्पना ताडे, रमण वेलणकर, मधुकर बाजी, भास्कर मेहेंदळे, अभय गोडबोले, मोहन साठे, मधुकर शेंबडे, संतोष वाघ, श्रीकांत शेटे, केदार नाईक, गजाननराव बोबडे, श्री रामदास स्वामी भक्त मंडळाचे कार्याध्यक्ष रंगराव जाधव, अध्यक्ष लक्ष्मण भंडारे, उपाध्यक्ष नारायण खरे, खजिनदार मनोहर कुमठेकर, सचिव अभय गोडबोले, पादुका मिरवणूक स्वागत समितीचे अध्यक्ष रवींद्र सबनीस, सचिव मोहन साठे, साहेबराव जांभळे, सहसचिव तसेच कार्यवाहक व सजावटप्रमुख म्हणून राजेंद्र कासट, रवींद्र परांजपे, भास्कर मेंहेंदळे यांची उपस्थिती होती. समर्थ सदन येथे पादुकाचे आगमन झाल्यावर मंडळाचे खजिनदार व ज्येष्ठ समर्थ भक्त अरविंद बुवा रामदासी, श्री समर्थ विद्यापीठाचे कुलपती समर्थ भक्त रमेशबुवा शेंबेकर रामदासी यांनी पादुकांचे दर्शन घेतले. सुनील कुलकर्णी, श्रीमती अनघा देसाई ,मोहन साठे, शनिवारी दि. 24 जानेवारी रोजी समर्थांच्या पादुका सकाळी सज्जनगड येथे जाण्यासाठी प्रस्थान ठेवणार आहेत

