
स्थैर्य, सातारा, दि. 24 नोव्हेंबर : श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड यांच्यावतीने गेल्या 31 वर्षापासून सुरू असलेला समर्थ सांप्रदायातील मानाचा असणारा श्री समर्थ रामदास स्वामी पुरस्कार यावर्षी श्री प्रभुदत्त महाराज ’रामदासी भाग्यनगर (हैदराबाद ) यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा श्री समर्थ कामधेनु गोशाळा श्री नारायण महाराज आश्रम जियागुडा भाग्यनगर (हैदराबाद) या ठिकाणी संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ज्ञानराज माणिकप्रभू महाराज पिठाधिपती माणिक प्रभू महाराज संस्थान माणिक नगर हे होते तर हा पुरस्कार योगी निरंजन नाथ प्रमुख विश्वस्त संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या हस्ते प्रदान करण्यातआला. या सोहळयास श्री समर्थ रामदास स्वामीं संस्थानचे अधिकारी विश्वस्त श्री सू. ग. तथा बाळासाहेब स्वामी, रामदास स्वामी संस्थांचे विश्वस्त भूषण स्वामी, विश्वस्त, डॉक्टर ज्योत्स्ना कोल्हटकर, डॉक्टर अनंत निमकर तसेच समर्थ सांप्रदायातील महंत मठपती उपस्थित होते.
श्री रामदास स्वामी संस्थांन च्या वतीने सन्मानपत्र रोख रक्कम मानपत्र तसेच श्री समाधीवरील शाल श्री प्रभुत्त महाराज रामदासी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
प्रभुदत्त महाराज हे श्री समर्थ कामधेनु गोशाळा (जियागुडा) या ठिकाणी चालवत आहेत.रामदास स्वामी परंपरेतील या मठामध्ये जवळपास आठ हजार पाचशे गाईंचे संगोपन होत असून शंभरहून गाई गो भक्षकांच्या तावडीतून सोडवून या ठिकाणी त्यांचे संगोपन केले जात आहे.
गो सेवेचे वृत्त निष्ठेने जपणारे भारतातील एकमेव अशी ही गोशाळा आहे. या गोसेवे बरोबरच रामदासी सांप्रदायातील परंपरा या मठांमध्ये अत्यंत निष्ठेने जपली जात आहे. या मठात रामपंचायतचीं अत्यंत सुंदर अशा रेखीव मूर्ती असून या ठिकाणी दैनंदिन उपासना सुरू असते. नित्य अन्नदान अखंड गोसेवा या उपक्रमांची दखल घेत श्री समर्थ रामदास स्वामी संस्थांनने हा पुरस्कार श्री समर्थ कामधेनू गो शाळेच्या प्रभुदत्त महाराज रामदासी यांना प्रदान केला आहे. या सोहळ्यास रामदासी महंत मठपती संपर्क कार्यालय प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

