
दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत विद्यापीठ स्तरावर घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन मुलांच्या ८०० मीटर धावणे या अॅथलेटिक्स प्रकारातील स्पर्धेमध्ये श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील विजय संजय जाधव या विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकाविले. या कामगिरीमुळे त्याची १७ फेब्रुवारी २०२५ ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये गडचिरोली येथे होणार्या अश्वमेध स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजय जाधव हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या ८०० मीटर धावणे अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच कबड्डी या मैदानी खेळ प्रकारामध्ये भूषण महादेव पाटील, खो-खो या मैदानी खेळ प्रकारामध्ये अस्मिता माळी या विद्यार्थीनींचीही राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशामागे प्रशिक्षक तथा क्रीडा विभागाचे प्रा. रोशन सोडमिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन राहिले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या कौतुकास्पद विजयाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे मे. गव्हर्निंग कौन्सिलचे सभासद सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी खेळाडू विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.